‘कॅम्पस’ होणार ‘हाय-फाय’
By Admin | Updated: November 25, 2014 00:53 IST2014-11-25T00:53:33+5:302014-11-25T00:53:33+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे दावे अनेकदा करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी झालीच नाही.

‘कॅम्पस’ होणार ‘हाय-फाय’
नागपूर विद्यापीठ : संपूर्ण परिसर ‘वाय-फाय’ करण्याचे प्रयत्न सुरू
योगेश पांडे - नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे दावे अनेकदा करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी झालीच नाही. परंतु आता ‘आयटी रिफॉर्म्स’च्या उंबरठ्यावर असणाऱ्या विद्यापीठाने ‘हायटेक’ पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना सहजपणे एका ‘क्लिक’वर जगातील घडामोडी अन् एखाद्या विषयातील बारकावे जाणता यावेत याकरिता संपूर्ण परिसरात ‘वाय-फाय’ यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून लवकरच कुलगुरूंची परवानगी मिळेल. डिसेंबरअखेरीस ही सुविधा पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महात्मा फुले शैक्षणिक परिसरात अनेकदा ग्रंथालय हाऊसफुल्ल असल्याने विद्यार्थी ‘लॅपटॉप’ घेऊन विभागाच्या पायऱ्यांवर अभ्यास करताना दिसतात. परंतु ‘इंटरनेट कनेक्शन’ नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनानेच पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना ‘वाय-फाय’ सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंबंधातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, कुलगुरूंची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विद्यापीठाचे माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ‘वाय-फाय’संदर्भातील प्रस्ताव असून, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या सर्व ठिकाणी ही सुविधा सुरू होईल, अशी आशा आहे. सरकारच्याच योजनेतून ही कल्पना समोर आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कुठे मिळणार सुविधा?
‘वाय-फाय’ इंटरनेट कनेक्शनची ही सुविधा विद्यापीठाचे ग्रंथालय, एलआयटी परिसर, अमरावती मार्गावरील महात्मा फुले प्रशासकीय परिसर (कॅम्पस), लॉ कॉलेज जवळील विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि विद्यापीठाचे मुलींचे वसतिगृह येथे ही ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील ‘कॅम्पस’ आणि एलआयटी परिसरात ‘बीएसएनएल’च्या माध्यमातून ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. या दोन्ही परिसरासाठी साधारणत: ४७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. ‘बीएसएनएल’ला या ‘प्रोजेक्ट’साठी ८४ लाख रुपये अगोदरच देण्यात आले आहेत. शिवाय इतर ठिकाणी ‘वाय-फाय’सुविधा उभारण्यासाठी लागणारी रक्कम गरज भासल्यास विकास कोष किंवा सामान्य कोषातून टाकण्यात येईल, असेदेखील सूत्रांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना फायदा
विद्यापीठाच्या निरनिराळ्या परिसरांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फार लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये ‘स्मार्टफोन’चा वापर वाढीस लागला आहे. त्यामुळे एका ‘क्लिक’वर त्यांना परिसरात कुठेही सहजपणे इंटरनेट वापरता येणार आहे. विशेषत: निरनिराळ्या विभागांमध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ही सुविधा फारच उपयुक्त ठरणार आहे.