पार्टी करायला आले, दोघे तलावात बुडाले; भागीमहारी येथील धक्कादायक घटना

By जितेंद्र ढवळे | Updated: March 2, 2025 21:46 IST2025-03-02T21:45:40+5:302025-03-02T21:46:56+5:30

वाचवायला गेलेला युवकदेखील पाण्यात बुडून मृत्यू पावला.

Came to party two drowned in pool Shocking incident at Bhagimahari | पार्टी करायला आले, दोघे तलावात बुडाले; भागीमहारी येथील धक्कादायक घटना

पार्टी करायला आले, दोघे तलावात बुडाले; भागीमहारी येथील धक्कादायक घटना

नागपूर (पारशिवनी) : रविवारी सुटी असल्याने नागपूर येथील ७ युवक पार्टी करायला पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी येथील पाटबंधारे विभागाच्या तलावावर आले होते. यातील एक युवक आंघोळीकरिता पाण्यात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याला वाचवायला गेलेला युवकदेखील पाण्यात बुडून मृत्यू पावला. ही घटना रविवारी दुपारी २:३० ते ३ वाजताच्या सुमारास घडली.
रोहित हिरालाल पाल (वय ३७, रा. छिंदवाडा, हल्ली मुक्काम मानेवाडा चौक, नागपूर), मनोज मोतीराम गायकवाड (४०, रा. मानेवाडा, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही रेल्वेमध्ये खासगी नोकरी करीत होते.

रोहित व मनोज हे त्यांचे मित्र संदीप अहिरे, अभिषेक यादव, विकास रॉय, शिवकुमार समुद्रे, नीलेश टेंभुर्णे व इंदर यादव पाच मित्रांसोबत पार्टी करायला दुपारी भागीमहारी गावापासून जवळ असलेल्या पाटबंधारे विभागाच्या बांधराझरी तलावावर आले होते. काही वेळ फिरल्यानंतर यातील ५ जणांनी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. दुपारी २:३० ते ३ वाजताच्या दरम्यान रोहित व मनोज आंघोळीकरिता पाण्याजवळ आले. अशातच मनोज पाण्यात उतरला. तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्याकरिता रोहित पाण्यात उतरला. पाणी खोल असल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

याबाबत माहिती कळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी बोलावले. तत्पूर्वी स्थानिक लोकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रोहित पालचा मृतदेह सापडला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. सायंकाळी ७ वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली. पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहेत.

Web Title: Came to party two drowned in pool Shocking incident at Bhagimahari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर