घरगडी म्हणून आला, आता अधिकारी झाला; संघर्ष, जिद्द आणि चिकाटीचा परिपाक
By मंगेश व्यवहारे | Updated: November 9, 2023 12:08 IST2023-11-09T12:08:16+5:302023-11-09T12:08:24+5:30
राम बिहारी आई-वडिलांना एकुलता एक. गुरे राखत त्याने गावात पाचवीपर्यंत शिक्षण घेतले.

घरगडी म्हणून आला, आता अधिकारी झाला; संघर्ष, जिद्द आणि चिकाटीचा परिपाक
नागपूर : वयाच्या अकराव्या वर्षी आई-वडिलांना सोडून तो नागपुरात एका कुटुंबाकडे घरगडी म्हणून आला. येथे निष्ठेने घरकाम करत उच्चशिक्षण घेतले. पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी केली अन् आता बिहार सरकारमध्ये ब्लॉक पंचायत राज अधिकारी होऊन त्याने आपल्या संघर्षाची चमक दाखविली. या युवकाचे नाव आहे राम बिहारी देवेंद्र झा. तो मूळचा बिहारमधील भानपूर (जि. समस्तीपूर) येथील आहे.
राम बिहारी आई-वडिलांना एकुलता एक. गुरे राखत त्याने गावात पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. त्याच्या परिचयातील एका वयोवृद्ध महिलेला केअर टेकरची गरज होती. त्यामुळे वडिलांनी अकराव्या वर्षी बेगुसराय येथे पाठविले. पुढे २०१० मध्ये त्या महिलेला नागपुरात उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्यासोबत राम बिहारीही आला. वयोवृद्ध महिलेच्या नातेवाइकांनी राम बिहारीला पंडित नेहरू विद्यालयात प्रवेश घेऊन दिला. पुढे महिलेचा मृत्यू झाला. कुटुंब प्रमुखाचीही बदली झाली. राम बिहारी घराचा केअर टेकर म्हणून येथेच थांबला. दहावी, बारावी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत पुढे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून त्याने बीएस्सी केली.
नागपूरकरांनी दिला आधार
तो केअर टेकर होता ते घर त्याला २०२० मध्ये सोडावे लागले. आर्थिक अडचणी वाढल्या, पण नागपूरकर मित्र आणि शिक्षक मदतीला आले. मित्रांकडे तो चार महिने नि:शुल्क राहिला.
शिक्षणासाठी पैशाची अडचण येतच होती. अशावेळी ओळखीतील अनेक जण मदतीचा हात पुढे करायचे. याच प्रवासात त्याला त्याची अर्धा एकर शेतीही विकावी लागली.