बीवीजीला दंड, जानेवारीच्या बिलमध्ये कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:08+5:302021-02-05T04:56:08+5:30
लोकमत इम्पॅक्ट लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अचानक ११३ कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याने बीवीजीच्या कर्मचाऱ्यांनी काम करणे बंद केले. त्यामुळे ...

बीवीजीला दंड, जानेवारीच्या बिलमध्ये कपात
लोकमत इम्पॅक्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अचानक ११३ कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याने बीवीजीच्या कर्मचाऱ्यांनी काम करणे बंद केले. त्यामुळे अर्ध्या शहरातील कचरा संकलन तीन दिवस पूर्णपणे ठप्प राहिले. परिस्थती रुळावर यायला आठवड्यापेक्षा अधिक वेळ लागला. यामुळे मनपा प्रशासनाला रोषणाला सामोरे जावे लागले. नागरिकांनाही मोठी अडचण सहन करावी लागली. या कारणाने घनकचरा व्यवस्थापन विभागाने कंपनीविरुद्ध अधिकाधिक दंडाची तरतूद केली आहे.
जानेवारीत कंपनीचे जे काही बिल तयार होईल, त्यातून १० टक्के रक्कम कपात करण्याचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. कारण मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाईचे अधिकार आयुक्तांकडे सुरक्षित आहेत. लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दर महिन्याला जवळपास ५ कोटी रुपयांचे कचरा संकलनाचे बिल तयार होते. शहरात दोन कंपन्या आहेत. एका कंपनीला म्हणजेच २.५० कोटी रुपयाचे बिल बीवीजीचे निघते. अशा परिस्थितीत २५ लाख रुपयांच्या जवळपास दंड लागण्याची शक्यता आहे.
शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था अधिक चांगली व्हावी, यासाठी दोन कचरा संकलन कंपनी तैनात करण्यात आली. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांना काम देण्यात आले.ंझोन १ ते झोन ५ची जबाबदारी एजी एन्व्हायरो कंपनीला तर झोन ६ ते झोन १०ची जबाबदारी बीवीजी कंपनीला देण्यात आली.ंपरंतु १३ महिन्यात ७ ते ८ वेळा दोन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. लहान लहान विषयावर काम बंद करण्याची प्रथा सुरुवातीपासूनच आहे. यामुळे कंपनीचे कामच समाधानकारक नाही, हे दिसून येते. एजी एन्वायरो कंपनीला १९५० रुपये प्रति टन आणि बीवीजी कंपनीला १८०० रुपये प्रति टन मनपा देत आहे. परंतु त्यामानाने काम होत नाही आहे. एजी एन्वायरो कंपनीनेही लॉकडाऊनच्या नावावर १२३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.
बॉक्स
कर्मचाऱ्यांच्या परतण्यावरही शंका
बीवीजीने ज्या ११३ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. त्याबाबतची स्थिती स्पष्ट करण्यात यावी, असे मनपा प्रशासनातर्फे कंपनीला सांगण्यात आले आहे. परंतु कंपनी गोलमाल उत्तर देत आहे. त्यामुळे कर्मचारी परत येतील की नाही, हे स्पष्ट होत नाही आहे.