पॅकबंद असलेलेच उपवासाचे अन्न पदार्थ विकत घ्या
By सुमेध वाघमार | Updated: July 15, 2024 19:04 IST2024-07-15T19:03:20+5:302024-07-15T19:04:48+5:30
अन्न प्रशासानाचे आवाहन : मार्च महिन्यात १००वर जणांना झाली होती विषबाधा

Buy packaged fasting foods only
सुमेध वाघमारे
नागपूर : बुधवारी आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक उपवास करतात. उपवासाच्या विविध पदार्थांची चव या दिवशी चाखली जाते. परंतु मार्च महिन्यात उपवासाच्या अन्नपदार्थांमधून नागपुरात जवळपास १००वर जणांना झालेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संभव्य अपाय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठ विकत घेताना किंवा उपवासाचे तयार पदार्थ विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्या, असे आवाहन केले आहे.
महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्य शिंगाड्याचे पीठ व उपवास भाजणी पीठापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थ खाल्ल्याने मेयो, मेडिकलसह इतरही शासकीय व खासगी रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढली होती. याची खबरदारी घेत ‘एफडीए’ने सोमवारी प्रसिद्ध पत्रक काढून नागरिकांना सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहेत. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, भगरीवर मोठया प्रमाणात ‘अस्परजिलस’ या प्रजातीच्या बुरशीचा प्रभाव असतो. ज्यामुळे ‘फ्युमिगाक्लेविन’ या सारख्या विषद्रव्य तयार होतात. जुलै महिन्यातील तापमान व आद्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकुल असते. अशी बुरशीचा प्रादूर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होवू शकते. त्याअनुषंगे नागरीकानी व अन्न व्यवसायिक व हॉटेल चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
संभव्य अपाय टाळण्यासाठी हे करा
- भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठा व खादयतेल आदी विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्या.
- या अन्नपदार्थावर ‘ब्रॅन्ड’ नसल्यास दुकानदाराला याबाबत विचारणा करा.
- अन्नपदार्थांच्या पॅकेटवर उत्पादन केव्हा झाले याचा तपशील पाहुन घ्या.
- खुल्या भगरीचे पीठ बाजारतून विकत घेवू नका
- भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करा.
- भगर साठवितांना ती स्वच्छ कोरडया ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्ब्यात ठेवा,
- जास्त दिवस भगर साठवू नका. जास्त दिवस साठविलेली भगर खाऊ नका.
- उपवासाचे अन्न पदार्थ व घटक पदार्थ खरेदी करतांना विक्रेत्यांकडुन बिल घ्या.
- भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठापासून तयार उपवासाचे अन्न पदार्थ लगेच सेवन करा, शिळे अन्न टाळा.
- भगर आणि शेंगदाणे हे अधिक प्रथिनयुक्त पदार्थ आहेत. या पदार्थांचे सलग दोन-तीन दिवस सेवनाने अॅसिडीटीचा त्रास होवू शकतो.
दुकानदारांनी घ्यावयाची काळजी
- विनाबिलाने कोणतेही अन्नपदार्थ खरेदी व विक्री करु नये.
- चांगल्या प्रतीची भगर व पॅकबंदच अन्नपदार्थांची विक्री करावी.
- मुदतबाहय झालेले अन्नपदार्थांची विक्री करु नये.
- भगरीचे पीठ स्वत तयार करुन विक्री करु नये.
येथे तक्रार नोंदवा
अन्नखाद्यपदार्थ खरेदी करताना काही आक्षेपार्ह आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन, नागपूर कार्यालयाच्या दुरध्वीनी क्रमांक ०७१२-२५६२२०४ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही सह आयुक्त (अन्न) कै . रं. जयपूरकर यांनी केले आहे.