डेबिट कार्ड नागपुरात खरेदी अमेरिकेत
By Admin | Updated: October 8, 2015 02:48 IST2015-10-08T02:48:15+5:302015-10-08T02:48:15+5:30
नागपूरच्या एका व्यक्तीच्या एटीएम कम डेबिट कार्डच्या माध्यमातून अमेरिकेतील शिकागो शहरातून...

डेबिट कार्ड नागपुरात खरेदी अमेरिकेत
नागपूरच्या व्यक्तीला २९ हजारांचा चुना
नागपूर : नागपूरच्या एका व्यक्तीच्या एटीएम कम डेबिट कार्डच्या माध्यमातून अमेरिकेतील शिकागो शहरातून तब्बल २९ हजार रुपयांची खरेदी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संजयकुमार सुंदर, रा. प्रतापनगर चौक खामला असे पीडिताचे नाव आहे. सुंदर हे कळमेश्वर येथील एका स्टील कंपनीमध्ये ज्युनिअर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. सदर बाजार येथील कॅनरा बँकेमध्ये त्यांचे सेव्हींग अकाऊंट आहे.
नेहमीप्रमाणे १ तारखेला त्यांचा पगार बँकेत जमा झाला. ६ तारखेला त्यांनी लोन फेडण्यासाठी ३० हजाराचा धनादेश दिला. परंतु तो चेक बाऊंस झाला. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. बँकेत पैसे असतानाही चेक बाऊंस कसा झाला, याचा विचार करीत असतानाच त्यांना बंगळुरुवरून एका व्यक्तीचा फोन आला. त्याने त्यांच्या अकाऊंटमधील पैसे खर्च होत असल्याची माहिती दिली.
९ यानंतर सुंदर यांनी लगेच पत्नीला फोन करून बँकेत शिल्लक असलेले पैसे काढून टाकण्यास सांगितले. तेव्हा त्यातील २९ हजार रुपये कमी असल्याचे लक्षात आले. सुंदर यांनी बुधवारी बँकेत जाऊन विचारपूस केली. तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या डेबीट कार्डच्या माध्यमातून अमेरिकेतील शिकागो शहरात खरेदी करण्यात आल्याचे आढळून आले. मंगळवारी दुपारी ३.२५ वाजता ११,२५६, ३.२६ वाजता १०,१२७ आणि ३.५४ वाजता ७,३५७ रुपयांची खरेदी करण्यात आली होती.
डेबिट कार्ड आपल्याजवळ असताना खरेदी झालीच कशी, असा प्रश्न त्यांना पडला. यासंदर्भात त्यांनी बँकेकडे लेखी तक्रार केली. तसेच सदर पोलीस ठाण्यालाही लेखी तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)