फूलपाखरांच्या जनगणनेसाठी ‘बटरफ्लाय माॅनिटरिंग स्किम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 16:09 IST2021-11-12T16:04:04+5:302021-11-12T16:09:00+5:30

या याेजनेच्या माध्यमातून देशात विविध प्रजातीच्या फूलपाखरांची संख्या किती आहे, हे निश्चित हाेईल. कालानुरूप काेणत्या प्रजातीचे अस्तित्व टिकले, काेणते नामशेष झाले, बाह्य घटकांचा परिणाम काय, अशा अनेक गाेष्टींचा डेटा तयार हाेईल.

Butterfly Monitoring Scheme project for Butterfly Census | फूलपाखरांच्या जनगणनेसाठी ‘बटरफ्लाय माॅनिटरिंग स्किम’

फूलपाखरांच्या जनगणनेसाठी ‘बटरफ्लाय माॅनिटरिंग स्किम’

ठळक मुद्देराष्ट्रीय स्तरावर पहिलेच नेटवर्क : संवर्धन व धाेरण निश्चितीसाठी माेठी मदत

निशांत वानखेडे

नागपूर : देशात फूलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजातींची निश्चित संख्या, कालानुरूप विविध घटकांचा झालेला परिणाम यांचा अभ्यास करून त्याचा सुसूत्रित डाटा तयार करणे व धाेरण तयार करण्यासाठी ‘भारतीय बटरफ्लाय माॅनिटरिंग स्किम’ (आयबीएमएस) तयार केली जात आहे. युके, युराेप व अमेरिकन नेटवर्कच्या धर्तीवर देशात पहिल्यांदाच व्यापक स्तरावर फूलपाखरांच्या जनगणनेसाठी नेटवर्क तयार केले जात आहे.

१९९० मध्ये देशात पहिल्यांदा पुणे येथे फूलपाखरांचे माॅनिटरिंग डाॅ. कृष्णमेघ कुंटे यांनी केले हाेते. त्यानंतर नागपूरचे डाॅ. आशिष टिपले यांनी अंबाझरी उद्यानातील फूलपाखरांचे माॅनिटरिंग केले. डाॅ. कुंटे यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय स्तरावरचे नेटवर्क आकाराला येत आहे.

डाॅ. आशिष टिपले यांनी आयबीएमएस सुरू करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. आपल्या देशात फूलपाखरांच्या १५०५ प्रजातींचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रात ते ३०० च्या वर, तर विदर्भात १८५ प्रजाती पाहावयास मिळतात. मात्र, या प्रत्येक प्रजातीची संख्या किती तसेच प्रदूषण व हवामान बदलाचा काय परिणाम झाला, काेणती प्रजाती धाेकाग्रस्त स्थितीत आहे याबाबत निश्चित डाटा उपलब्ध नाही. नव्या नेटवर्कच्या माध्यमातून या कमतरता दूर करता येतील. देशभरातून १०० च्या वर संशाेधक, अभ्यासक, निसर्गप्रेमी या नेटवर्कशी जाेडण्यात येत आहेत.

युके व युराेपमधील नेटवर्क

इंग्लंडमध्ये १९७६ ला पहिल्यांदा ‘युके बटरफ्लाय माॅनिटरिंग स्किम’ स्थापन झाली. याच्या यशानंतर युराेपातील अनेक देशांनी युराेपीयन स्किमच्या अंतर्गत माॅनिटरिंग केले. पुढे अमेरिकेतही अशाप्रकारे नेटवर्क सुरू करण्यात आले. या दीर्घकालीन अभ्यासातून मिळालेल्या डेटाच्या वैज्ञानिक मूल्यामुळे अनेक धोक्यात असलेल्या फूलपाखरांच्या प्रजातींची लोकसंख्या पुनर्संचयित आणि संरक्षित करण्यात मदत झाली आहे.

भविष्यात प्रत्येक कामासाठी उपयाेग

- आयबीएमएसद्वारे देशाच्या काेनाकाेपऱ्यातून फूलपाखरांचे वर्षानुवर्षे माॅनिटरिंग केले जाईल.

- विशिष्ट प्रजातींची संख्या किती आहे. १०-२० वर्षांत या संख्येवर बाह्य घटकाचा परिणाम झाला का?

- वाढते तापमान, प्रदूषण, दीर्घकालीन हवामान बदल, बदलत्या जमिनीचा वापर, पीक प्रणाली व रासायनिक खतांच्या वापराने बदललेली कृषी पद्धती, आदी घटकांच्या परिणामांचे निरीक्षण करणे, त्यांचा दीर्घकालीन ट्रेंड समजून घेणे.

- या घटकांमुळे काेणती प्रजाती दीर्घकाळ टिकून आहे, काेणती नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहे, यातून फूलपाखरांची व्यवहार्यता, दीर्घकाळ टिकण्याची क्षमता समजून घेता येईल.

- हा संपूर्ण डाटा गाेळा करून एकत्रीकरण करण्यात येईल. त्यानुसार फूलपाखरांच्या संवर्धनाबाबत धाेरण ठरविण्यात येईल आणि राज्य वनविभाग आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयास सादर करण्यात येईल. या डाटाद्वारे धाेरण ठरविणे साेपे हाेईल.

- हा बेसिक डाटा भविष्यात असंख्य विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कामी येईल.

हा माेठा प्रकल्प आहे. या याेजनेच्या माध्यमातून देशात विविध प्रजातीच्या फूलपाखरांची संख्या किती आहे, हे निश्चित हाेईल. कालानुरूप काेणत्या प्रजातीचे अस्तित्व टिकले, काेणते नामशेष झाले, बाह्य घटकांचा परिणाम काय, अशा अनेक गाेष्टींचा डेटा तयार हाेईल. हा डेटा संवर्धन, धाेरण निर्धारण व अभ्यासासाठी उपयाेगी ठरेल.

- डाॅ. आशिष टिपले, फूलपाखरू संशाेधक

Web Title: Butterfly Monitoring Scheme project for Butterfly Census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.