बुटीबोरीतील खुलेआम मद्यपान बंद!
By Admin | Updated: December 9, 2014 00:58 IST2014-12-09T00:58:33+5:302014-12-09T00:58:33+5:30
बुटीबोरीच्या मुख्य चौकात खुलेआमपणे सुरू असलेले मद्यपान अखेर पोलिसांच्या कारवाईने बंद झाले. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच ‘पेट्रोलिंग पार्टी’वर मद्यपानावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविली.

बुटीबोरीतील खुलेआम मद्यपान बंद!
पोलिसांचे लक्ष : दुकानदारांसह हातठेलेधारकांना दिली तंबी, पेट्रोलिंग पथकाची विशेष नजर
नागपूर : बुटीबोरीच्या मुख्य चौकात खुलेआमपणे सुरू असलेले मद्यपान अखेर पोलिसांच्या कारवाईने बंद झाले. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच ‘पेट्रोलिंग पार्टी’वर मद्यपानावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविली. आज, सोमवारी दिवसभरात बुटीबोरी पोलिसांनी तेथे मद्यपान होऊ दिले नाही. तसेच दुकानदाराला, हातठेलेधारकांना तंबी देण्यात आली, हे विशेष!
बुटीबोरी येथील मुख्य चौकात अवैधपणे दारू विक्री, खुलेआम मद्यपान होत असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ‘स्टिंग आॅपरेशन’ राबविण्यात आले. याबाबत ‘बुटीबोरीच्या मुख्य चौकात खुलेआम मद्यपान’ शीर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित झाले. त्याची दखल घेत बुटीबोरी पोलिसांनी सकाळीच घटनास्थळी हजेरी लावली.
दारूविक्री करणाऱ्या दुकानदाराला तंबी दिली, तसेच हातठेल्यांवरून चिवडा आणि साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही समज दिली. त्यांच्याकडील काचेचे ग्लास फोडले. प्लास्टिकचे ग्लास जप्त केले. दिवसभरात अशी कारवाई दोनदा झाली. खुलेआम सुरू असलेल्या मद्यपानाकडे लक्ष ठेवण्याची विशेष जबाबदारी पोलिसांच्या ‘पेट्रोलिंग पार्टी’वर देण्यात आली. हे पथक त्या ठिकाणी जाऊन आले. यापुढे खुलेआम मद्यपानाचा प्रकार लक्षात आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे बुटीबोरी पोलिसांनी सांगितले. केवळ अधिवेशनापुरती ही कारवाई नको तर कायमस्वरुपी दारू पिण्याचा हा प्रकार बंद व्हावा, असे मत बुटीबोरीतील अनेक नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केले. त्यामुळे पोलिसांवरील जबाबदारी वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नागरिकांनीच पुढाकार घ्यावा
मुख्य चौकालगत, महामार्गाच्या कडेला खुलेआम दारू पिण्याचा प्रकार हा सहा-आठ महिन्यात, वर्षभरात सुरू झालेला नाही. हा प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू आहे. बुटीबोरी पोलीस ठाण्यात किमान वर्षभरापूर्वी रुजू झालेले ठाणेदार दिगांबर चव्हाण यांनाही हा प्रकार रुजू होताच लक्षात आला. याबाबत त्यांनी दुकानदारांना समज देऊन हातठेले हटविण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र त्यास बुटीबोरीतील काही नागरिकांनी विरोध केला. पोलिसांच्या कारवाईत नागरिकांनी हस्तक्षेप केला आणि मद्यपानाचा हा प्रकार वाढत गेला. हातठेल्यांची संख्या वाढली. त्यामुळे दारुड्यांचा त्रासही वाढत गेला. आतातर या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या बसस्थानकावरील प्रवाशांना, बाजारात येणाऱ्या ग्राहकांना दारुड्यांचा हा प्रकार नाईलाजास्तव सहन करावा लागायचा. ‘लोकमत’ने सामाजिक भान राखत हा प्रकार चव्हाट्यावर आणला. मात्र यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेऊन असे कृत्य थांबविणे गरजेचे आहे.