‘बंटी’च नव्हे ‘बबली’चीही दहशत
By Admin | Updated: October 5, 2015 02:57 IST2015-10-05T02:57:34+5:302015-10-05T02:57:34+5:30
नागपूर : उपराजधानीचा ‘क्राईम ग्राफ’ गेल्या काही काळापासून वाढीस लागल्याची ओरड होत आहे. गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

‘बंटी’च नव्हे ‘बबली’चीही दहशत
नागपूर : उपराजधानीचा ‘क्राईम ग्राफ’ गेल्या काही काळापासून वाढीस लागल्याची ओरड होत आहे. गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलांचे प्रमाणही लक्षणीय आहे. गेल्या साडेपाच वर्षात विविध गुन्ह्याअंतर्गत शहरातून साडेसहा हजारांहून अधिक महिलांना अटक करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महिला गुन्हेगारांची संख्या, त्यातील सराईत गुन्हेगार इत्यादींबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. यासंदर्भात पोलीस विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१० ते जुलै २०१५ या कालावधीत शहरामध्ये ६,६९१ महिलांना अटक झाली. यातील ३४ महिलांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली तर ४४० महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या कालावधीमध्ये अटक झालेल्या महिलांपैकी सर्वात जास्त महिलांना दारूबंदी कायद्याअंतर्गत पकडण्यात आले. २०१० ते २०१४ या कालावधीत २ हजार १८१ महिलांना याअंतर्गत अटक झाली तर १० महिलांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यासाठी गजाआड करण्यात आले.