रविभवनातील बंगल्यांचा वापर वर्षभर, दुरूस्ती आवश्यकतेनुसार: अधीक्षक अभियंता भानुसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 21:30 IST2025-11-07T21:23:14+5:302025-11-07T21:30:46+5:30
: दोन बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मंत्र्यांचेही पत्र

रविभवनातील बंगल्यांचा वापर वर्षभर, दुरूस्ती आवश्यकतेनुसार: अधीक्षक अभियंता भानुसे
नागपूर : रविभवन येथील बंगल्यांची देखभाल, दुरुस्ती व रंगरंगोटीवर कोट्यवधींचा खर्च करण्यात येत असल्याचे आरोप होत आहे. परंतु रविभवनातील बंगलयांचा वापर हा केवळ अधिवेशन काळापूरता मर्यादित नाही. तर वर्षभरत्यांचा वापर होतो. त्यामुळे येथील बंगल्यांची दुरूस्ती ही आवश्यकतेनुसारच होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील नागपूर विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांनी शुक्रवारी सांगितले. काही बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधित मंत्र्यांचे पत्र असल्याची बाबही त्यांनी यावेळी मान्य केली.
रविभवन येथील बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च होत असून या खर्चाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी आवश्यकोनुसारच दुरूस्तीची कामे करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर शुक्रवारी अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे आणि कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रविभवनातील बंगले जुने ७५ वर्षे आहेत. सर्वच बंगले एकाच वेळी खराब होत नाही.
दरवर्षी काही बंगल्यांची मेजर दुरुस्ती करावी लागते. यंदा ९, १८ व २९ क्रमांच्या या तीन बंगल्याचे संपूर्ण छत व टाईल्स बदलवण्याची गरज होती. त्यानुसार ते काम केले जात आहे. इतर बंगल्याचीही आवश्यकतेनुसारच दुरूस्ती केली जात आहे. काही बंगल्यासाठी मंत्र्यांचे पत्र आले आहे. बंगल्यात करावच्या कामासाठी त्यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्यात. त्यानुसार काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी अधिवेशनानिमित्त कामे करण्यात येते. परंतु बंगल्याचा वापर हा वर्षभर होतो. त्यामुळे ही कामे आवश्यकत असतात. साधारणत: १२ ते १५ लाख रुपये एका बंगल्याच्या दुरुस्तीवर खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
-राजभवनात किचन व दुरूस्तीचे मोठे काम
राजभवन येथे यंदा १० कोटींचे कामे प्रस्तावित करण्यात आले आहे. राजभवन परिसर अतिशय विस्तीर्ण आहे. अनेक खोल्या तेथे आहेत. तेथील मुख्य इमारतीमध्ये दुरूस्ती आणि किचनचे काम आहे. यासोबतच तेथे पाच बंगले आहेत. त्याचीही कामे असून टाॅयलेटचेही काम असल्याचे भानुसे यांनी सांगितले.
- ९ कॅबिनेट मंत्र्यांची व्यवस्था नागभवनात
रविभवन येथे तीस बंगले आहेत. यापैकी ६ बंगले हे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती आणि दोन विरोधी पक्ष नेते यांच्यासाठी राखीव असते. मंत्रिमंडळात ३३ कॅबिनेट मंत्री आहेत. २४ मंत्र्यांची व्यवस्था रविभवनात होईल. त्यामुळे ९ कॅबिनेट मंत्र्यांच्या राहण्याची व्यवस्था ही राज्यमंत्र्यासाठी असलेल्या नागभवन येथे करण्यात येणार असल्याचे भानुसे यांनी यावेळी सांगितले.