सराफा बाजार कोलमडला
By Admin | Updated: November 13, 2016 02:38 IST2016-11-13T02:38:24+5:302016-11-13T02:38:24+5:30
सराफा व्यापाऱ्यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केल्यामुळे बाजारात शुकशुकाट आहे.

सराफा बाजार कोलमडला
सोमवारपर्यंत बंद : ग्राहकांशी वाद नको : जुन्या नोटा स्वीकारणार नाही
नागपूर : सराफा व्यापाऱ्यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केल्यामुळे बाजारात शुकशुकाट आहे. ग्राहक सोने खरेदीसाठी जुन्या नोटा आणत असून ग्राहकांसोबत वाद नको म्हणून सराफांनी सोमवारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोठीवगळता छोटी दुकाने शनिवारी सुरू होती, पण सोन्याची खरेदी-विक्री झाली नाही.
नवीन नोटा चलनात येईपर्यंत अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदीसाठी केवायसी आणि पॅनची झेरॉक्स मागण्यात येत असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली आहे. सोना चांदी ओळ कमिटीचे अध्यक्ष रविकांत हरडे यांनी सांगितले की, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पाहता सोन्याची विक्री हजारात आणि लाखांत असते. अनेकांकडे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा आहेत. मोठी रक्कम बँकेत भरताना केवायसी वा पॅनकार्डची झेरॉक्स मागत आहे. झंझट नको म्हणून ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत, अशांनी सोने खरेदीचा निर्णय घेतला. निर्णयानंतर बुधवार, ९ नोव्हेंबरला ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारात आले. पण सराफांनी चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अनेकांची निराशा झाली. व्यापारी नोटा स्वीकारत नसल्याचे माहीत झाल्यानंतर ग्राहक बाजारात फिरकले नाहीत. अनेक सराफांनी सोमवारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवसाय सुरळीत होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल.
असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, ग्राहक काळ्या पैशाने सोने खरेदीसाठी बाजारात येत आहेत. जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी बाध्य करीत आहेत. ग्राहकांशी वाद नको म्हणून दुकाने बंद ठेवण्याचा सोपा मार्ग आम्ही स्वीकारला. ९ तारखेला अनेकांना केवायसी आणि पॅन कार्ड मागितले. पण त्यांनी देण्यास नकार दिला. याची माहिती ग्राहकांना झाल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ग्राहक बाजारात आलेच नाही. मुबलक चलन बाजारात आल्यानंतर स्थिती पूर्ववत होईल.
असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, ग्राहकांशी वाद नको म्हणून शोरूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नवीन नोटा चलनात आल्यानंतर दागिने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना तोपर्यंत वाट पाहावी लागेल.
सोन्याच्या दागिन्यांची विक्री लाखांत असते. चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारून सोन्याची विक्री करणे शक्य नाही. बाजारात शुकशुकाट होता. (प्रतिनिधी)
सोने खरेदी-विक्री करणारे अडचणीत
केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरच्या सायंकाळी जाहीर केल्यानंतर शासकीय अधिकारी आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पैसा बँकेत भरला तर आयकर आणि दंडाची आकारणी होण्याची भीती त्यांच्यात निर्माण झाली. आयकर अधिकाऱ्यांच्या त्रासापासून बचाव करण्याच्या दृष्टीने अनेकांनी सोन्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
ग्राहकांच्या मानसिकतेचा फायदा घेत सराफांनी प्रति तोळा ३० हजारावर असलेल्या सोन्याची विक्री तब्बल ३८ आणि ४० हजार रुपये तोळ्यानुसार केली. जास्त भावाने सोने विकणाऱ्या सराफांची आयकर विभाग चौकशी करीत असल्याची माहिती आहे.
९ नोव्हेंबरला पहाटेपर्यंत काही सराफांची दुकाने सुरू ठेवून सोने आणि दागिन्यांची कोट्यवधींची विक्री केल्याची अधिकृत माहिती आहे. ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे सराफांनी सोन्याचे भाव तोळ्यामागे तब्बल १० हजार रुपयांपर्यंत वाढविले. भाव वाढविल्यानंतरही ग्राहकांनी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ५०० आणि १०००च्या नोटा बंद झाल्यानंतरही सराफांनी त्या नोटा स्वीकारल्या. जास्त भाव दागिने खरेदी करणारे आणि विकणारे आयकर विभागाच्या रडारवर आले असून ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयकर विभागाने काही सराफा दुकानांची तपासणी केल्याची माहिती आहे.