म्हाडा कॉलनीवर गुंडांचा हल्ला

By Admin | Updated: May 21, 2015 02:18 IST2015-05-21T02:18:46+5:302015-05-21T02:18:46+5:30

उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड ‘यावा’चा मुलगा औरभ आणि कुटुंबीयांनी जरीपटका येथील म्हाडा कॉलनीवर हल्ला करून दहशत पसरवली.

Bullet attack on MHADA colony | म्हाडा कॉलनीवर गुंडांचा हल्ला

म्हाडा कॉलनीवर गुंडांचा हल्ला

नागपूर : उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड ‘यावा’चा मुलगा औरभ आणि कुटुंबीयांनी जरीपटका येथील म्हाडा कॉलनीवर हल्ला करून दहशत पसरवली. शस्त्रांनी सज्ज यावाचा मुलगा व पुतण्याने एक डझनपेक्षा अधिक घरांवर हल्ला करून सामानांची व वाहनांची तोडफोड केली. महिला व पुरुषांना घरात घुसून मारहाण केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. गुन्हेगारांशी संगनमत असल्याने पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे २४ तास उलटूनही आरोपी मोकाट आहेत.
कुख्यात यावा याचा टेका नाका येथे जुगार अड्डा आहे. १५ दिवसांपूर्वी डीसीपी झोन चारच्या चमूने येथे धाड टाकली होती. म्हाडा कॉलनी येथील २७ वर्षीय संतोष यादव सोमवारी रात्री ९.३० वाजता त्याचा मित्र प्रकाश आणि मंजीतसोबत टेका नाका येथील पिंटूच्या पानटपरीवर गेला होता. तिथे यावाचा मुलगा व भाऊसुद्धा आला होता. त्यांनी संतोषच्या मित्रांना धक्का दिला होता. धक्का देण्याचे कारण विचारले असता दोघेही काहीही न बोलता निघून गेले होते. त्यानंतर संतोषही आपल्या घरी परत आला.
रात्री १०.३० वजता यावाचा मुलगा, भाऊ आणि पुतण्या तसेच २० ते २५ साथीदार शस्त्रांसह म्हाडा कॉलनी येथे आले. त्यांनी घरासमोर असलेल्या संतोषच्या मित्राच्या स्वीप्ट कारची तोडफोड केली. यानंतर बानोरकर नावाच्या महिलेच्या घरात घुसून सामान व वाहनांची तोडफोड केली. शेख आरीफ यांच्याही घरातील सामानांची व वाहनांची तोडफोड केली. त्यांच्या घरासमोर असलेली इनोव्हा गाडीची तोडफोड केली. संतोष यादवच्या घरावरही हल्ला करून तोडफोड केली. हल्लेखोरांनी डझनभर घरांवर हल्ला केला. अर्धा तास ही तोडफोड सुरू होती. आरोपी नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. पीएसआय योगिता श्रीखंडे यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. यावाची मुले व भाऊ गुन्हेगार आहेत. वर्षभरापूर्वीच यावाच्या मुलाने जुगार अड्ड्याची तक्रार केल्यामुळे तीन तरुणांवर खुनी हल्ला केला होता. यानंतर अनेकदा त्याच्याविरुद्ध तक्रारी आल्या परंतु पोलिसांनी त्या सर्व दाबून ठेवल्या. यावाच्या जुगार अड्ड्याची माहिती आहे.
हा हल्ला सुद्धा जुगार अड्ड्यासाठीच झाला. परंतु मागील काही दिवसांपासून जरीपटका परिसरात सुरू असलेल्या अराजकतेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांची भीती संपली
यावाचे कुटुंबीय २० ते २५ साथीदारांसोबत शस्त्रांनी सज्ज होऊन टेका नाकावरून म्हाडा कॉलनीपर्यंत येऊन एखाद्या वस्तीवर हल्ला करतात आणि संपूर्ण वस्तीला धमकी देऊन परत जातात. यावरून त्यांची हिम्मत लक्षात घेता पोलिसांची कुठलीही भीती त्यांना राहिलेली नसल्याचे दिसून येते. तसेच पोलीस आयुक्त बदलल्यानंतरही शहरातील गुन्ेहगारीची परिस्थिती मात्र बदललेली नाही, हे स्पष्ट होते.

Web Title: Bullet attack on MHADA colony