इमारत बांधकाम, डागडुजीच्या कामात घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:58+5:302021-01-08T04:24:58+5:30
आशिष दुबे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील इमारतींचे बांधकाम व डागडुजीच्या कामात लाखो रुपयांचा ...

इमारत बांधकाम, डागडुजीच्या कामात घोटाळा
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील इमारतींचे बांधकाम व डागडुजीच्या कामात लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे. कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. यामुळे अनेक जण अडचणीत येऊ शकतात.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणात गोपनीयता बाळगण्यात येत आहे. मागील चार महिन्यापासून या चौकशीची कुणालाही माहिती नव्हती. घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याअगोदर कुलगुरू आणखी ठोस पुरावे जमा करत आहेत. पुढील काही महिन्यांत ‘नॅक’ समितीचा दौरादेखील आहे. त्यामुळे प्रकरण शांत ठेवण्यात आले आहे. ‘नॅक’चा दौरा आटोपल्यानंतर प्रकरणाच्या फायली उघडून दोषींवर कारवाई होऊ शकते. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
मागील सात ते आठ वर्षांपासून विद्यापीठात इमारत निर्माण (नवीन प्रशासकीय इमारत वगळता) व डागडुजीचे काम सुरू आहेत. संघटित पद्धतीने घोटाळा करण्यात आला व त्यामुळे कुणालाही संशय आला नाही.
असा झाला खुलासा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळलम्यानंतर डॉ.चौधरी यांनी अधिकाऱ्यांसोबत विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसर व इतर विभागांचा दौरा केला होता. यावेळी त्यांना इमारतींमधील त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. कामाबद्दल संशय आल्याने त्यांनी उच्चस्तरीय समिती नेमली होती.
कंत्राटदारांनादेखील झाली विचारणा
चौकशी समितीने इमारतींचे बांधकाम व डागडुजी करणाऱ्या कंत्राटदारांचीदेखील चौकशी केली आहे. यादरम्यान समितीला अनेक महत्त्वाच्या बाबी कळाल्या आहेत. ज्यांना कामाचे कंत्राट दिले नव्हते, असेदेखील कंत्राटदार समिती सदस्यांना भेटले.