‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’ लवकरच साकारणार
By Admin | Updated: April 30, 2015 02:30 IST2015-04-30T02:30:07+5:302015-04-30T02:30:07+5:30
देशविदेशातील विद्यार्थ्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बुद्धिस्ट स्टडी सेंटर दिले आहे.

‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’ लवकरच साकारणार
नागपूर : देशविदेशातील विद्यार्थ्यांना बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बुद्धिस्ट स्टडी सेंटर दिले आहे. यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. परंतु मागील आठ वर्षांपासून या सेंटरच्या इमारतीचे काम रखडलेलेच होते. लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला अखेर जाग आली असून सेंटरच्या कामाला तातडीने सुरुवात होत आहे. येत्या बुद्धपौर्णिमेला इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनसुद्धा होणार आहे.
बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी देशविदेशातील विद्यार्थी भारतात मोठ्या प्रमाणावर येतात. नागपूर हे बौद्ध आंबेडकरी चळवळीचे केंद्र समजले जाते. या पार्श्वभूमीवर आणि विद्यापीठाने केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने नागपूर विद्यापीठाला बुद्धिस्ट सेंटरची परवानगी दिली. यासाठी निधीसुद्धा मंजूर केला. एक कोटीच्या घरात हा निधी असल्याचे सांगण्यात येते. आठ वर्षांपूर्वी हा निधी विद्यापीठाकडे प्राप्त झाला. सुरुवातीला हे सेंटर कुठे करावे यावर बराच विचार झाला. बुद्धिस्ट सेंटरची इमारत उभारण्यासाठी अमरावती रोडवरील विद्यापीठ कॅम्पस परिसरातील जागा शोधण्यात आली. मात्र त्याला अनेकांचा विरोध होता. त्यानंतर रामदासपेठ येथील विद्यापीठ लायब्ररी, डॉ. आंबेडकर थॉट्स आणि बुटी सभागृह या तीन इमारतींच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर जागा असल्याचे अनेक मान्यवरांनी सुचविले. जागा पाहण्यात आली. बुद्धिस्ट सेंटरसाठी ही जागा योग्य राहील, असा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु या जागेवर मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे होती. यावर आक्षेप घेण्यात आला. महापालिकेकडे झाडे तोडण्याची परवानगी मागण्यात आली. या प्रक्रियेसाठी दीड वर्षाचा कालावधी गेला. महापालिकेने मंजुरी दिली. दोन वर्षांपूर्वी झाडे तोडण्यात आली. तेव्हा इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. परंतु झाडे तोडून जागा मोकळी करण्यात आली. तेव्हापासून त्या जागेकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी तोडलेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटली. ती झाडे पुन्हा मोठी होऊ लागली. त्यामुळे इमारतीच्या बांधकामासाठी पुन्हा एकदा झाडांची अडचण निर्माण झाली.
दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या विद्यापीठ अॅकेडेमिक कौन्सिलच्या बैठकीत सदस्य डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी यासंबंधातील प्रश्न उपस्थित केला होता.
तेव्हा कुलगुरूंनी विद्यापीठाच्या इंजिनियरला इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्यानंतरही विद्यापीठ प्रशासनातर्फे बुद्धिस्ट स्टडीच्या इमारतीच्या कामाबाबत कुठलीही हालचाल सुरू झाली नव्हती. लोकमतने बुद्धिस्ट स्टडी सेंटरचा प्रश्न सुरुवातीपासून लावून धरला होता. पाली प्राकृत व आंबेडकर थॉट्स विभाग आणि रिपब्लिकन मुव्हमेंटसह अनेक सामाजिक संघटनांनी यासंबंधात वेळोवेळी आवाज उचलला होता. अखेर लोकमत आणि सामाजिक संघटनांची दखल विद्यापीठ प्रशासनाला घ्यावी लागली. येत्या बुद्ध पौर्णिमेला केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि बुद्धगयेतील भंते सत्यपाल यांच्या विशेष उपस्थितीत बुद्धिस्ट स्टडी सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे बुद्धिस्ट स्टडी सेंटर लवकरच साकारणार आहे. (प्रतिनिधी)