दीक्षाभूमीवर बुद्धिस्ट सेमिनरी
By Admin | Updated: October 1, 2014 00:48 IST2014-10-01T00:48:35+5:302014-10-01T00:48:35+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. ते स्थळ आज दीक्षाभूमीच्या नावाने अजरामर झाले आहे. जगप्रसिद्ध स्मारक, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक

दीक्षाभूमीवर बुद्धिस्ट सेमिनरी
अन् स्मारक उभे राहिले : सदानंद फुलझेले यांनी उलगडला इतिहास
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. ते स्थळ आज दीक्षाभूमीच्या नावाने अजरामर झाले आहे. जगप्रसिद्ध स्मारक, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था, देशातील पहिल्यांदाच शिलालेखावर कोरण्यात आलेली संविधानाची प्रास्ताविका आणि २२ प्रतिज्ञेच्या स्तंभानंतर आता दीक्षाभूमीवर बुद्धिस्ट सेमिनरी उभी राहणार आहे.
नागपूरलाच बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित केले होते. दीक्षेसाठी लाखो अनुयायी येणार हे सुद्धा ठरलेले होते. त्यामुळे जागा निवडण्याचे मोठे आव्हान होते. परंतु तत्कालीन उपमहापौर असलेल्या एका उमद्या तरुणाने हे आव्हान लीलया पार पाडले आणि त्या महामानवाने टाकलेला विश्वास सार्थकी लावला.
त्याने निवडलेली ती जागा आज जगभरात दीक्षाभूमी या नावाने अमर झाली आहे. इतकेच नव्हे भारतातील बौद्ध आंबेडकरी अनुयायांचे ते सर्वोच्च धार्मिक स्थळ बनले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ऐतिहासिक धम्मक्रांतीचे प्रत्यक्ष साक्षीदार आणि त्यावेळचे उपमहापौर म्हणजे आजचे स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले हे होत. गेल्या ५८ वर्षांपासून ते धम्मदीक्षेचा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. न थांबता, न थकता त्यांचे काम अविरत सुरू असून आता बुद्धिस्ट सेमिनरी उभारण्यासाठी त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. दीक्षाभूमी आज ज्या स्वरुपात उभी आहे, त्यामागे त्यांनी दीक्षाभूमीला वाहून घेतलेले समर्पण आहे. दीक्षाभूमी कशी उभी राहिली, याचा इतिहास खुद्द त्यांनीच उलगडून सांगितला आहे. (प्रतिनिधी)
शैक्षणिक स्मारकाची उभारणी
ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्या ठिकाणी बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक उभे राहावे, अशी प्रत्येक आंबेडकरी बौद्ध अनुयायाची इच्छा होती. ती इच्छा रास्तही होती. परंतु केवळ इच्छा राहून चालत नाही. त्यासाठी निधीची सुद्धा गरज असते. त्यामुळे १९६३ मध्ये पहिल्यांदा दीक्षाभूमी परिसरात शैक्षणिक स्मारक म्हणून डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. अनेक अडीअडचणीनंतर महाविद्यालय उभे राहिले. आज डॉ. आंबेडकर महाविद्यालय हे केवळ शहरातील नव्हे तर महाराष्ट्रातील आणि देशातील सुद्धा महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. या संस्थेच्या उभारणीनंतरच खऱ्या अर्थाने स्मारकाच्या कामाला गती आली.
महामानवाच्या अस्थी
दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत होते. परंतु अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या अस्थी नव्हत्या. ७ आॅक्टोबर १९८१ रोजी धम्मदीक्षेच्या रौप्य महोत्सवी पर्वावर मुंबईच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीने बाबासाहेबांच्या अस्थी दादासाहेब गायकवाड यांच्या स्वाधीन केल्या. २ आॅक्टोबर २००१ रोजी अस्थिकलशाची विधिवत स्थापना करण्यात आली तर थायलंडचे भिक्खू सवांग यांनी दान केलेली तथागत गौतम बुद्धांची मूर्ती २५ फेब्रुवारी १९९६ ला समितीच्या स्वाधीन केली.
संविधान प्रास्ताविकेचा शिलालेख
दीक्षाभूमीवर भारतीय संविधानाची प्रास्ताविका कोरण्यात आलेली आहे. देशाच्या संविधान प्रास्ताविकेचा शिलालेख कोरणारे दीक्षाभूमी हे देशातील एकमेव स्मारक ठरले आहे. एका सुंदर शिलालेखावर ही प्रास्ताविका कोरण्यात आलेली असून, हा शिलालेख खास वैशिष्ट्य ठरले आहे. मध्यवर्ती स्मारकाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरच संविधान प्रास्ताविकेचा शिलालेख उभारण्यात आला आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत हा शिलालेख कोरण्यात आलेला आहे. संविधानाची मूळ प्रत असलेल्या ज्या सुंदर तैलरूपी चित्रात ही प्रास्ताविका लिहिण्यात आली होती त्याच पद्धतीने भव्य शिलालेखावरही ती कोरल्या गेली आहे.