लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि "प्रबुद्ध भारत" घडविण्यासाठी देशभरात लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना संविधानिक चौकटीत आणण्याचा निर्धार भीम सेनाने केला आहे. येत्या बुधवारी नागपुरातून याची सुरूवात होत असून १ ऑक्टोबर बेझनबाग मैदान इंदोरा येथे भव्य धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भीम सेनाचे प्रवक्ते भदंत हर्षबोधी महास्थवीर यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
भदंत हर्षबोधी यांनी सांगितले की, बुधवारी मुख्य कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता होईल. भदंत आनंद महास्थवीर हे अध्यक्षस्थानी राहतील. उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ( मध्य प्रदेश) सुरेशकुमार कैत हे उद्घाटन राहतील. आ. राजकुमार बडोले हे स्वागताध्यक्ष राहतील. तर मुख्य अतिथी म्हणून भंते विनयाचार्य, भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर, खासदार श्याम कुमार बर्वे, आ. अनिल देशमुख, आ. संजय मेश्राम राहतील
यावेळी एक हजार भिक्खू संघास भव्य संघदान होईल. श्रीलंका, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चीन, अमेरिका, इंग्लंड, नेपाळ तसेच भारतातील विविध राज्यांतील भिक्खू संघ विश्वशांतीसाठी बुद्ध वचने पठण करतील. सुप्रसिद्ध संगीतकार, गीतकार व गायक विष्णू शिंदे (मुंबई) तसेच साथी कलाकार - राहुल शिंदे, सुषमा देवी, रवीराज भद्रे, अंजली भारती, आनंद कीर्तने, स्वरलक्ष्मी लहाने यांच्या कडून बुद्ध - भीम गीतांचा भव्य महाजलसा होणार आहे. पत्रपरिषदेला भीम सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे, संजय मुन, रत्नशील लिहितकर, सचिन मून उपस्थित होते.