बसपा यंदा खातेही उघडणार आणि राज्यात मान्यताही मिळवणार
By आनंद डेकाटे | Updated: March 16, 2024 16:04 IST2024-03-16T16:03:56+5:302024-03-16T16:04:42+5:30
बसपा नेत्यांचा विश्वास : कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज दिन साजरा

बसपा यंदा खातेही उघडणार आणि राज्यात मान्यताही मिळवणार
नागपूर : बसपा हा राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष असला तरी राज्यात त्याला मान्यतेसाठी अजून पर्यंत हवी तेवढी मते व निकाल मिळालेला नाही. परंतु या लोकसभा निवडणुकीत बसपाला मान्यता प्राप्त होण्याऐवढी मते सुद्धा मिळतील आणि राज्यात बसपाचे खातेही उघडेल, असा विश्वास बसपा नेत्यांनी व्यक्त केला. बहुजन नायक व बसपाचे संस्थापक कांशीरामजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित बहुजन समाज दिवस कार्यक्रमादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
हिंदी मोर भवन सीताबर्डी येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसपाचे प्रदेश महासचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज अॅड सुनील डोंगरे हे होते. पृथ्वीराज शेंडे, दादाराव उईके, उत्तम शेवडे, राहुल सोनटक्के, विलास सोमकुवर, मुकेश सरकार, साहित्यिक शूद्र शिवशंकर यादव प्रामुख्याने उपस्थित होते.
कांशीरामजींचा जन्मदिवस, देशभर बहुजन समाज दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहुजन चळवळीत कार्य करणाऱ्या सक्रिय ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना कांशीरामजी रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावेळी नागपुरातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कांशीरामजींच्या अस्थिकलशा समोर बसपा कार्यकर्त्यांनी बसपाला यश मिळेपर्यंत सक्रियरित्या कार्य करण्याची शपथ घेतली. संचालन जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी केले. तर जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांनी आभार मानले.