विदर्भाच्या मुद्यासह बसपा मैदानात

By Admin | Updated: September 8, 2014 02:23 IST2014-09-08T02:23:22+5:302014-09-08T02:23:22+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्या अंतर्गत बसपाने रविवारी...

BSP with Vidarbha issue | विदर्भाच्या मुद्यासह बसपा मैदानात

विदर्भाच्या मुद्यासह बसपा मैदानात

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्या अंतर्गत बसपाने रविवारी दीक्षाभूमी ते संविधान चौक दरम्यान संघर्ष ज्योत रॅली काढून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
बसपा सुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करीत आली आहे. समर्थन इतरही राजकीय पक्षांनी केले आहे, मात्र बसपाची भूमिका सुरुवातीपासून कायम आहे, हे विशेष. यंदाची निवडणूक बसपा विदर्भाच्या मुद्यावरच लढणार आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या कार्यक्रमांवरून याचे अंदाज बांधले जात होते. रविवारी बसपाने विदर्भ संघर्ष ज्योत पदयात्रा काढून ते जाहीर केले. रविवारी सकाळी ही पदयात्रा निघणार होती. परंतु पावसामुळे दुपारी २ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. तत्पूर्वी दीक्षाभूमी स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून संघर्ष ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
पदयात्रा दीक्षाभूमी, काचीपुरा चौक, रामदासपेठ, लोकमत चौक, पंचशील चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, गोवारी शहीद स्मारक मार्गे संविधान चौकात पोहोचली. येथे जाहीर सभा घेण्यात आली. या संघर्ष ज्योत यात्रेत घोड्यांवर स्वार असलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. सुरेश माने यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, विदर्भाच्या मुद्यावर आजवर विविध पक्षांनी लोकांना मूर्ख बनविले आहे. लोकांना खरच विदर्भ हवा असेल तर बसपाला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
संघर्ष ज्योत यात्रेत कृष्णा बेले, हरीश बेलेकर, किशोर गजभिये, उत्तम शेवडे. अहमद कादर, भाऊ गोंडाणे, उषा बौद्ध, छाया कुरडकर, विश्वास राऊत, सागर डबरासे,, विवेक हाडके, पक्षाचे सर्व नगरसेवक आदींसह विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: BSP with Vidarbha issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.