बसपा लागली निवडणुकीच्या तयारीला; २५ विधानसभा, ७ लोकसभांच्या जागावर लक्ष केंद्रीत
By आनंद डेकाटे | Updated: August 19, 2023 16:21 IST2023-08-19T16:18:23+5:302023-08-19T16:21:13+5:30
विदर्भावर अधिक लक्ष, संघटनात्मक बांधणीवर भर

बसपा लागली निवडणुकीच्या तयारीला; २५ विधानसभा, ७ लोकसभांच्या जागावर लक्ष केंद्रीत
नागपूर : बसपाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत राज्यभरातील विधानसभेच्या सर्व २८८ व लोकसभेच्या सर्व ४८ जागांचा संघटनात्मक आढावा घेतला जात आहे. यातही जिंकण्याच्या दृष्टीने विधानसभेच्या २५ व लोकसभेच्या ७ जागांवर लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे यांनी शनिवारी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. संदीप ताजणे यांनी सांगितले, बसपाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यभरात पक्षाचा संघटनात्मक आढावा व कार्यकर्ता मेळावे घेतले जात आहे. पक्षाचे केंद्रीय प्रभारी राजभर हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून नागपूर जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. १६ तारखेपासून विधानसभा निहाय आढावा व कार्यकर्ते मेळावे घेतले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात बुथ स्तरीय आढावा घेतला जात असून बुथ अदिक मजबूत करण्यावर भर दिला जातोय. कार्यकर्त्यांना अधिकाधिक जबाबदारी दिली जात आहे. बुथ स्तरावरच्या कमिट्या तयार केल्या जात आहे. यातून पक्षाचे संघटन अधिक मजबूत केले जात आहे. बसपा सध्या तरी स्वबळावरच लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत प्रभारी अॅड. सुनील डोंगरे, नागोराव जयकर, उत्तम शेवडे, जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते.
पक्षाचे कॅडर मतदारही परतले
२०१९ चा अपवाद सोडला तर बसपाचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत वाढले. परंतु २०१९ मध्ये केलेली चूक मतदारांना आता उमगली आहे. बसपाचे कॅडर मतदारही आता परतले आहेत. राज्यातील एकूणच संभ्रमावस्थेमुळे मतदार प्रचंड नाराज असून प्रस्तापित पक्षांना सोडून ते यावेळी बसपाकडे येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.