BRSP's Suresh Mane has filed nomination | बीआरएसपीतर्फे सुरेश माने यांनी भरला उमेदवारी अर्ज

बीआरएसपीतर्फे सुरेश माने यांनी भरला उमेदवारी अर्ज

ठळक मुद्देसंविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने यांनी गुरुवारी नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज सादर केला.
तत्पूर्वी विदर्भ निर्माण महामंचतर्फे दीक्षाभूमी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅली काढण्यात आली. संविधान चौकात ही रॅली पोहोचली. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना अ‍ॅड. सुरेश माने म्हणाले की, ही निवडणूक प्रस्थापितांना सोपी जाणार नाही. नितीन गडकरी विकासाच्या गोष्टी करतात परंतु नागपूर शहरात अजूनही अनेक वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होतो. यालाच विकास म्हणत असाल तर नागरिक माफ करणार नाही. विकासाच्या मुद्यावर गडकरी यांना आपण रोज पाच प्रश्न विचारणारआहोत. नाना पटोले हे भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्याने ते पवित्र झाले असे नाही. जनता त्यांनाही माफ करणार नाही. विदर्भवादी उमेदवार म्हणून आपल्याला जनता भरभरून मतदान करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्यासोबत अ‍ॅड. वामनराव चटप, राजेश बोरकर, ज्ञानेश वाकुडकर आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: BRSP's Suresh Mane has filed nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.