बीआरएसपी समविचारी पक्षासोबत निवडणूक लढणार -डाॅ. सुरेश माने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 23:20 IST2025-11-07T23:20:05+5:302025-11-07T23:20:33+5:30
बसपा-वंचितसोबत युतीचेही संकेत

बीआरएसपी समविचारी पक्षासोबत निवडणूक लढणार -डाॅ. सुरेश माने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी) या निवडणुका समविचारी पक्षासोबतच लढवणार असल्याची माहिती बीआरएसपीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. सुरेश माने यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
डाॅ. सुरेश माने यांनी सांगितले की, भाजपप्रणित महायुती आणि काॅंग्रेसप्रणित महाआघाडी यांना वगळून समविचारी पक्षांसोबत आमची चर्चा सुरू आहे.
ज्या ठिकाणी सामंजस्य झाले तिथे मिळून आणि जिथे सामंजस्य झाले नाही तिथे पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे. सध्या नगरपरिषद व नगरपंचायतच्या निवडणुका आहेत. या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. नागपूरबाबत विचार केला तर कामठी, कळमेश्वर, कन्हान, बहादुरा आदी काही भागांवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. याबाबत पक्षाच्या बैठकीतही निर्णय घेण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये बीआरएसपी, बसपा व वंचितने सोबतयेऊन विडणूक लढवावी अशा स्थानिक स्तरावरच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. कार्यकर्त्यांच्या या भावनेशी मी सहमत आहे. तसे झाले तर मी तयार आहे, असे सांगत त्यांनी बसपा व वंचितसोबत युतीचेही संकेत दिले.
पत्रपरिषदेला लटारी मडावी, डाॅ. विनोद रंगारी उपस्थित होते.
- गडचिरोलीत आदिवासी जनचेतना महासंमेलन
बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बीआरएसपीतर्फे येत्या १५ व १६ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील राजीव गांधी सभागृह इंदिरा गांधी चौक येथे भारतीय आदिवासी परिषद आणि आदिवासी दलित एकदा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेत आदिवासींशी संबंधित विविध विषयांवर देशभरातील तज्ज्ञ मंडळी विचार व्यक्त करतील. यावेळी डाॅ. सुरेश माने लिखीत आदिवासी शाेषण संघर्ष सरकारी नीती -दशा -दिशा आव्हाने या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल. या कार्यक्रमाची माहितीही यावेळी देण्यात आली.