भाऊ... राखी मिळाली का रे तुला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:10 IST2021-08-22T04:10:39+5:302021-08-22T04:10:39+5:30

- रक्षाबंधनाला भाऊरायांना बहिणीने पाठविलेल्या राखींची प्रतीक्षा : पोस्टमन रविवारीही कर्तव्य पार पाडण्यास सज्ज प्रवीण खापरे / लोकमत न्यूज ...

Brother ... did you get rakhi? | भाऊ... राखी मिळाली का रे तुला?

भाऊ... राखी मिळाली का रे तुला?

- रक्षाबंधनाला भाऊरायांना बहिणीने पाठविलेल्या राखींची प्रतीक्षा : पोस्टमन रविवारीही कर्तव्य पार पाडण्यास सज्ज

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आपल्या माहेरापासून फार लांबवर असलेल्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पर्वावर येणे जमले नाही म्हणून अनेकींनी आपल्या भावाला पोस्टाने राखी पाठविल्या आहेत. पोस्टाने पाठविलेली राखी म्हणजे परंपरेचा केवळ दंडक नव्हे तर तिच्या मनातील आपल्या भावाविषयी असलेले अविरल, निग्रही अन् नि:स्पृह असे प्रेम होय. या प्रेमाची महती जाणत नाही, असा भाऊच नाही. म्हणूनच राखी पोस्टात टाकल्यापासूनच तिचा दररोज फोन असतो... भाऊ, राखी मिळाली का रे तुला? त्यावर.. येईल गं ताईडे तू चिंता कसली करतेस? हे असले उत्तर, राखीची प्राण पणाला लावून वाट बघत असलेला भाऊ देतो आहे. ज्यांना राखी मिळाली त्यांचा आनंद गगनात मावेना अन् ज्यांना मिळाली नाही ते... मिळाली गं ताईडे तुझी राखी, अशी थाप मारून बहिणीच्या मनाला पश्चात्ताप होऊ नये, अशी काळजी घेत आहेत.

प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधण्याची परंपरा अखंडितपणे लहानपणापासून चालवते. लहानपण संपले की प्रत्येक बहीण कधीतरी माहेर सोडून सासरी जाणार हे निश्चितच. आपल्याच गावात, शहरात किंवा आसपासच्या जिल्ह्यात असेल तर भाऊ किंवा बहीण या सोहळ्याला प्रत्यक्ष हजर राहतील. ते फार लांबवर अर्थात मुंबई, पुणे, बेंगळूरू, दिल्ली आदी किंवा इंग्लंड, अमेरिका येथे परदेशात आहेत, त्यांना प्रत्यक्ष भेट अशक्यच.

बहीण-भावाच्या आत्मिक प्रेमाची ही जाण असलेल्या भारतीय पोस्टाने रक्षाबंधनाचे विशेष असे नियोजन केले आहे. रविवार हा सुटीचा दिवस असतानाही देशभरातील पोस्टमन आपले कर्तव्य बजावण्यास सज्ज असणार आहेत. नागपूर जीपीओ आणि शहरातील पोस्ट ऑफिसेसनी त्याअनुषंगाने जय्यत तयारी चालविली आहे.

३०० हून अधिक पोस्टमन रक्षाबंधनासाठी सज्ज

गव्हर्नमेंट पोस्ट ऑफिस (जीपीओ) मध्ये २० पोस्टमन आहेत आणि शहरात असे ३००हून अधिक पोस्टमन आहेत. रविवारी हक्काची सुटी असली तरी केवळ रक्षाबंधनासाठी सर्व पोस्टमन स्वेच्छेने कर्तव्यावर असतील. परगावाहून येणारे पार्सल रविवारीही उघडले जाणार आहे. साधारणत: एकाच दिवशी शहरातील दहा हजारावर राखी व गिफ्ट बॉक्सची डिलिव्हरी अगत्याने संबंधितांपर्यंत पोहोचविण्याचे टार्गेट आहे. त्याच अनुषंगाने बुकिंगसाठी जीपीओमधील काऊंटरची संख्या दोनवरून चार करण्यात आली आहे.

आतापर्यंत पोस्टाने १८ हजार राखी पोहोचवल्या

नागपुरातून दररोज परगावाकडे जाणाऱ्या राखी व गिफ्ट बॉक्सचे दररोज ११००च्या वर बुकिंग होत आहे. यासोबतच तेवढ्याच संख्येने दररोज नागपुरात डिलिव्हरी केल्या जात आहेत. आतापर्यंत परगावात राहणाऱ्या बहिणींनी पाठविलेल्या १८ हजाराहून अधिक राखी नागपुरातील पोस्टमन्सनी भावांपर्यंत पोहोचविल्याची माहिती जीपीओच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. रक्षाबंधनाच्या पर्वावर राखीला प्राधान्य देण्यात आले आहे.

पोस्टाला नात्यांची जाण

राखी पौर्णिमेच्या अनुषंगाने संपूर्ण भारतात विशेष आयोजन करण्यात आले आहे. नागपूर विभागात सर्व पोस्टमन उपस्थित राहणार असून, बहिणीने पाठविलेल्या राख्या भावांपर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य ते पार पाडतील. राखी पौर्णिमेला येणाऱ्या राखी संबंधितांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे, याला प्राधान्य असणार आहे. पोस्टाला नात्यांची जाण कायम असते.

- बी. व्ही. रमण्णा, सिनियर पोस्टमास्तर, नागपूर जीपीओ

..................

Web Title: Brother ... did you get rakhi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.