जवाहरलाल दर्डा यांच्या कांस्य पुतळ्याचे आज जबलपूरमध्ये अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 07:22 IST2025-05-26T07:21:39+5:302025-05-26T07:22:36+5:30
वर्तमान व भावी पिढ्यांना मिळेल प्रेरणा; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव मुख्य अतिथी

जवाहरलाल दर्डा यांच्या कांस्य पुतळ्याचे आज जबलपूरमध्ये अनावरण
नागपूर : सामाजिक जीवनात आपल्या निःस्वार्थ, सर्जनशील योगदानाने अढळ ठसा उमटविणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, प्रभावी राजकीय नेते व लोकमत मीडिया समूहाचे संस्थापक स्वर्गीय श्री जवाहरलाल दर्डा उपाख्य श्रद्धेय बाबूजी यांच्या नव्याने उभारलेल्या कांस्य पुतळ्याचे अनावरण सोमवारी (दि. २६ मे) सायंकाळी ५.०० वाजता मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सेठ गोविंददास शासकीय जिल्हा रुग्णालय (व्हिक्टोरिया हॉस्पिटल) परिसर येथे केले जाईल. या भव्य समारंभामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील तर लोकमत मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.
याप्रसंगी मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाममंत्री राकेश सिंह, पंचायत व ग्रामीण विकासमंत्री प्रल्हादसिंह पटेल सन्माननीय अतिथी म्हणून तर, लोकसभा खासदार आशिष दुबे, राज्यसभा खासदार सुमित्रा बाल्मीक, आमदार अजय विश्नोई, आमदार अभिलाष पांडे, आमदार नीरज सिंह, आमदार लखन घनघोरिया, आमदार अशोक रोहाणी, आमदार सुशील तिवारी 'इंदू', आमदार संतोष बरकडे व जबलपूर महापालिकेचे महापौर जगत बहादूर सिंह अन्नू विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
स्वतंत्रता आंदोलनादरम्यान कारावासाची शिक्षा
बाबूजी यांनी स्वतंत्रता आंदोलनादरम्यान जबलपूर कारागृह येथे १ वर्ष ९ महिने कारावासाची शिक्षा भोगली होती. त्यानिमित्त येथे दरवर्षी आरोग्य शिबिर आयोजित करून रुग्णांना मोफत औषधे वितरित केली जातात. २००४ साली लोकमत समूहाच्या वतीने व्हिक्टोरिया हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभाग (आयसीयू) स्थापन करण्यासाठी निधी देण्यात आला होता. या विभागाला बाबूजी यांचे नाव देण्यात आले आहे. बाबूजी यांनी त्यांच्या निःस्वार्थ व दूरदृष्टीपूर्ण सामाजिक कार्यांद्वारे देश व जनसेवेच्या क्षेत्रामध्ये अमिट ठसा उमटवला आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापित ही कांस्य प्रतिमा वर्तमान व भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील.