अमरावती, छिंदवाडासह सात सॅटेलाईट शहरांना जोडणार ब्रॉडगेज मेट्रो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:14+5:302021-07-18T04:07:14+5:30
मोरेश्वर मानापुरे नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतरच नागपुरातील ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असून ...

अमरावती, छिंदवाडासह सात सॅटेलाईट शहरांना जोडणार ब्रॉडगेज मेट्रो
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतरच नागपुरातील ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असून कंपनी स्थापन करून उद्योजक ब्रॉडगेज मेट्रो चालविणार आहे. दोन्ही टप्पे एकूण ७५४ किमीचे असून पहिल्या टप्प्यात वर्धा, भंडारा रोड, नरखेड रामटेक आणि दुसऱ्या टप्प्यात अमरावती, छिंदवाडासह (मध्य प्रदेश) सात सॅटेलाईट शहरांना जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागपुरात प्रवासी आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.
व्हीआयएकडे खासगी गुंतवणूकदारांची जबाबदारी
ब्रॉडगेज मेट्रो प्रवाशांना १ तास १० मिनिटात अमरावतीला नेणार असून अन्य शहरांकरिता चालविण्यात येणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोने वेळेच्या बचतीसह प्रवाशांना भाडे कमी लागणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मार्च २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने ब्रॉडगेज मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने नोव्हेंबर २०१९ मध्ये डीपीआरला मान्यता दिली. विदर्भ विकासाला ध्यानात ठेवून देशातील पहिला महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे. ही मेट्रो उद्योजकांनी चालवावी, याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडे (व्हीआयए) दिली असून व्हीआयएच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्याचीही योजना तयार करण्यात आली आहे. या कोचेसची मालकी प्राधान्याने विदर्भातील उद्योजकांना देण्यात येणार असल्याने स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. या मेट्रोमध्ये असणाऱ्या जाहिराती, खानपान आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा, वस्तू विक्रीचे अधिकार हे संबंधित खासगी गुंतवणूकदारांना असणार असून याचा फायदा त्यांना होणार आहे .
लहान मोठ्या व्यापाऱ्यांना होणार फायदा
ब्रॉडगेज मेट्रोतून पूर्वीपेक्षा अर्ध्या वेळेत प्रवास करता येणार आहे. शहरातील महामेट्रोचा खर्च ३५० कोटी रुपये प्रती किमी असा असताना ब्रॉडगेज मेट्रोसाठी मात्र फक्त पाच कोटी प्रती किमी खर्च येणार आहे. ब्रॉडगेज मेट्रोसाठी मध्य रेल्वेचे ट्रॅक, सिग्नल आणि स्टेशनचा वापर केला जाईल. या मेट्रोमध्ये इकॉनॉमी आणि बिझनेस असे दोन क्लास असतील. अगदी वातानुकूलित वातावरणात प्रवास करता येईल. मेट्रो रेल्वेच्या एकूण आठ कोचेसमधून दोन कोच मालवाहतुकीसाठी राहणार आहे. यातून औषधी, विविध उत्पादने, भाजी आणि अन्य वस्तू पाठविता येईल. सर्व कोच एअरकुल्ड राहतील. त्याचा लहान व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. प्रत्येक तासाला एक गाडी याप्रमाणे सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजतापर्यंत ब्रॉडग्रेजचे संचालन होणार आहे.
१०० मेट्रो रेल्वे खरेदी करणार
२१ फेब्रुवारीला उद्योजकांच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रॉडगेज मेट्रो दीड वर्षांतच सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. याकरिता १०० मेट्रो रेल्वे खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पहिल्या रेल्वेचा ऑर्डर टीटागढ वॅगन लिमिटेड कंपनीला देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी एमएसएमई अंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे. ब्रॉडगेज मेट्रो तीन वर्षांतच नफ्यात येणार असल्याचा गडकरींचा दावा आहे. युरोपियन देशातील मेट्रोप्रमाणेच ही मेट्रो राहणार आहे. यात प्रवाशांसाठी सर्व सोईसुविधा राहणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात या शहरात धावणार ब्रॉडगेज मेट्रो :
नागपूर-अमरावती १४५ किमी
नागपूर-छिंदवाडा १५० किमी
नागपूर-बैतुल १०८ किमी
नागपूर-गोंदिया १३२ किमी
नागपूर-वडसा १२८ किमी
नागपूर-यवतमाळ २४० किमी
(उद्याच्या अंकात : ब्रॉडगेज मेट्रोसाठी उद्योजक आणि व्यावसायिकांची शासनाकडून अपेक्षा)