लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडीच्या नवनिर्मित उड्डाणपुलाचे गुरुवारी उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर शुक्रवारी दुपारी प्रजापती चौकात या पुलाचा सिमेंटचा मोठा भाग (मलबा) एका कारवर कोसळून कारचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत एका भाजप नेत्याचा मुलगा थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. बुट्टीबोरी उड्डाणपुलाचा काही भाग खचल्यानंतर आधीच वर्धा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली असताना आता पारडी उड्डाणपुलाचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाल्यामुळे उपराजधानीत कमकुवत पुलांचे बांधकाम करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रजापती चौकाच्यावर असलेल्या पारडी उड्डाणपुलाच्या प्लास्टरचा भाग तुटून खाली कोसळला. यावेळी तेथून जात असलेले पूर्व नागपुरातील भाजप नेता नवनीत श्रीवास्तव यांचा मुलगा विशेष आपली कार (क्रमांक एम.एच. ३१, एफ.आर. १४५३) ने तेथून जात होते. प्लास्टरचे मोठमोठे तुकडे आदळल्यामुळे त्यांच्या कारची विंडशिल्ड व सनरूफ तुटून वरील भाग क्षतिग्रस्त झाला. घटनेनंतर पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केल्याची माहिती नाही. पूल नसतानाही या भागात अपघात होत होते. आता पारडी पुलाचे उद्घाटन झाल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी अपघात झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जीडीसीएलमुळे काम निकृष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी कोसळला होता स्पॅनतीन वर्षापूर्वी बनविण्यात आलेल्या पारडी-कळमना पुलाचा एक स्पॅन कोसळला होता. त्यानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे जीडीसीएल कंपनीच्या कामावरच शंका उपस्थित करण्यात येत असून 'एनएचएआय'ने केलेल्या 'लोड टेस्ट'वरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
उड्डाणपूल राहणार बंदउद्घाटन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पारडी उड्डाणपुलाचा मलबा कोसळल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नव्याने तयार केलेला निकृष्ट दर्जाचा हा पूल बंद ठेऊन त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. परंतु दुरुस्तीसाठी 'एनएचएआय'चे अधिकारी साईटवर हजर राहतात की नाही, हा प्रश्नसुद्धा उपस्थित करण्यात येत आहे.
घाईगडबडीत केले काम, थर्माकोल असताना केले प्लास्टर
- पारडी उड्डाणपुलाच्या मानेवाडा व वैष्णोदेवी चौकाच्या आर्मचे काम खूप दिवसानंतर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला घाईगडबडीत पूर्ण करण्यात आले.
- सूत्रांनुसार पुलाच्या ज्वाईटवर प्लास्टिक व थर्माकोल लावलेला असताना त्यावरच प्लास्टर करण्यात आले. यामुळेच तो कंपन सहन न करता कोसळला. त्यामुळे आता प्लास्टरचे काम अधिकाऱ्यांच्या देखभालीखाली होऊ शकते.
"पारडी उड्डाणपुलाच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला आहे. ही मोठी त्रुटी नाही. प्रजापती चौकात पुलावरून मानेवाडा व सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील वाहतूक बंद ठेवून पुलाची दुरुस्ती करण्यात येईल."- आर. पी. सिंह, प्रादेशिक अधिकारी, एनएचएआय, नागपूर