विवाहाच्या नोंदणीसाठी मागितली लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:54+5:302021-04-11T04:07:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - विवाह नोंदणी करून देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्याला शनिवारी दुपारी एसीबीच्या पथकाने ...

विवाहाच्या नोंदणीसाठी मागितली लाच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - विवाह नोंदणी करून देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्याला शनिवारी दुपारी एसीबीच्या पथकाने जेरबंद केले. रामचंद्र बिंदा महातो (वय ४९) असे त्याचे नाव असून, तो महापालिकेच्या मंगळवारी झोन कार्यालयात चपराशी आहे.
तक्रार करणारा तरुण स्विगी डिलिव्हरीचे काम करतो. त्याचे लग्न झाले असून, या लग्नाची कायदेशीर नोंदणी करण्यासाठी त्याने दोन दिवसापूर्वी मंगळवारी झोन कार्यालय गाठले. तेथील चपराशी रामचंद्र महातो याने आवश्यक कागदपत्रांची तसेच पाच हजाराच्या लाचेची मागणी केली. सर्व कागदपत्रे सोबत असूनही पाच हजार रुपये कशाला हवे, अशी विचारणा केली असता लाच द्यायची नसेल तर या कार्यालयात पुन्हा येऊ नको, असे महातोने तक्रारदाराला बजावले. त्यामुळे तक्रारदाराने सरळ एसीबी कार्यालय गाठले. अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून या तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एसीबीचे उपअधीक्षक नरेश पार्वे यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास एसीबीचे पथक कारवाईसाठी मंगळवारी झोनमध्ये पोहचले. तेथे तक्रारदाराने आरोपी महातोसोबत चर्चा करून लाचेची रक्कम कमी करण्यास सांगितले. अखेर महातोने पाच ऐवजी साडेचार हजार रुपयात तडजोड केली. दुपारी १२ च्या सुमारा ही रक्कम महापालिका रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर स्वीकारताच एसीबीच्या पथकाने महातोच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
---
----