स्तन कर्करोग जनजागृती महिना; नागपुरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 09:40 IST2018-10-03T09:36:45+5:302018-10-03T09:40:49+5:30
देशात १९८२-८३ मध्ये महिलांच्या कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता; मात्र मागील ३० वर्षांत यात बदल झाला आहे. आता तो पहिल्या क्रमांकावर आला आहे.

स्तन कर्करोग जनजागृती महिना; नागपुरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात १९८२-८३ मध्ये महिलांच्या कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता; मात्र मागील ३० वर्षांत यात बदल झाला आहे. आता तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. हा कर्करोग जगभरातील स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. यात दगावणाऱ्या एकूण महिलांपैकी एकट्या भारतातील २३ टक्के महिलांचा समावेश आहे. हा आकडा ७० हजारांच्या घरात जातो. राज्याचा विचार केला तर मुंबईत हे प्रमाण ३३ टक्के असून, विदर्भ दुसऱ्या स्थानी आहे. एकट्या नागपुरात हे प्रमाण ३२ टक्के असल्याची कर्करोग तज्ज्ञांची माहिती आहे. विशेष म्हणजे, जानेवारी ते आॅगस्ट या सात महिन्यात मेडिकलमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे २५७ रुग्ण आढळून आले आहेत.
देशात दर २२ महिलांमध्ये एकीला स्तनाचा कर्करोग होतो. जगभरात दरवर्षी १ कोटी १० लाख महिला स्तनाच्या कर्करोगाने दगावतात. त्यापैकी २३ टक्के महिला एकट्या भारतातील आहेत. जगाच्या क्र मवारीत स्तनाच्या कर्करोगाने दगावणाऱ्यांमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. भारताच्या तुलनेत अमेरिकन स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आठमध्ये एका महिलेला आहे.
एकट्या भारतापुरता विचार करायचा तर दरवर्षी १३ लाख महिला कर्करोगाच्या विळख्यात अडकतात. त्यापैकी पाच लाख महिला वेळीच निदान न झाल्याने अकाली बळी पडतात. कर्करोग तज्ज्ञानुसार, एकट्या विदर्भात दर एक लाख महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असलेल्या सुमारे १५०० नव्या रुग्णांची भर पडत आहे.
नागपुरात हे प्रमाण सरासरी ३२ टक्के तर वर्धेत २६ टक्के आहे. पुण्यातील दर एक महिलांमध्ये २३ टक्के महिलांना स्तनाचा कर्करोग कवेत घेतो. स्त्रियांमध्ये वाढत्या वयानुसार स्तनाचा कर्करोग होण्याची जोखीमदेखील वाढते. त्यामुळे वयाची चाळिशी गाठलेल्या महिलांनी वर्षातून किमान एकदा मेमोग्राफी करून घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मेडिकलमधील धक्कादायक आकडेवारी
मेडिकलच्या रेडिएशन थेरपी अॅण्ड आॅन्कोलॉजी विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज ३०० वर रुग्ण उपचारासाठी येतात. यातील बहुसंख्य रुण स्तनाच्या कर्करोगाचे असतात. विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये या कर्करोगाचे ३२३ रुग्ण, २०१७ मध्ये ३२० तर जानेवारी ते आॅगस्ट २०१८ पर्यंत २५७ रुग्णांची नोंद झाली आहे.
गाठ आढळल्यास तात्काळ तपासणी
४० ते ५० या वयात ‘ब्रेस्ट कॅन्सर’ झपाट्याने वाढतो. परंतु ७० टक्के रुग्ण उपचारासाठी चौथ्या आणि पाचव्या स्टेजमध्ये येतात. अशावेळी उपचार करणे कठीण जाते. यावर उपाय म्हणजे, आपल्याच हाताने स्तनाची तपासणी करणे. यात स्तनात किंवा बगल यात गाठ आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
-डॉ. अशोक दिवाण
प्रमुख, रेडिएशन थेरपी अॅण्ड आॅन्कोलॉजी विभाग, मेडिकल
‘कॅन्सर’ म्हणजे आयुष्य ‘कॅन्सल’ नव्हे
‘कॅन्सर म्हणजे आयुष्य ‘कॅन्सल’ असा काहीसा गैरसमज आजही कायम आहे. परंतु आधुनिक उपचार पद्धतीने रुग्ण पूर्णपणे बरा होतो. प्राथमिक अवस्थेत या रोगाचे निदान झाल्यास ९९ टक्के रुग्ण बरा होऊ शकतो. रुग्णांच्या मनातील भीती काढण्यासाठी डॉक्टरांसह नातेवाईकांनी मदत करावी. योग्य उपचारामुळे आयुर्मान वाढविता येते, हा आत्मविश्वास द्यावा.
- डॉ. रोहिणी पाटील