अजनीतील वृक्षताेडीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:24+5:302020-12-04T04:22:24+5:30

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे हाेऊ घातलेल्या अजनी इंटर माॅडेल स्टेशनला सर्वच स्तरातून विराेध वाढला आहे. लाेकमतने हा विषय ...

Break to the tree trunk in Ajni | अजनीतील वृक्षताेडीला ब्रेक

अजनीतील वृक्षताेडीला ब्रेक

नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे हाेऊ घातलेल्या अजनी इंटर माॅडेल स्टेशनला सर्वच स्तरातून विराेध वाढला आहे. लाेकमतने हा विषय लावून धरताच पर्यावरणवाद्यांसह सामान्य नागपूरकरही या प्रकल्पाच्या विराेधात उभे ठाकले आहेत. दरम्यान, एकीकडे सर्व स्तरातून विराेध हाेत असताना दुसरीकडे महापालिकेच्या उद्यान विभागानेही एनएचएआयच्या भूमिकेवर शंका घेतली आहे. एनएचएआयने या प्रकल्पासाठी अजनी रेल्वे काॅलनी परिसरात वृक्षताेडीसाठी मागितलेली परवानगी उद्यान विभागाने राेखून धरली आहे.

एनएचएआयने अजनी रेल्वे काॅलनी परिसरात प्रकल्प उभारणीसाठी झाडे ताेडण्याची परवानगी मनपाच्या उद्यान विभागाकडे मागितली हाेती. मिळालेल्या माहितीनुसार, प्राधिकरणाने सुरुवातीला १२०० व नंतर १५०० झाडे ताेडण्यासाठी परवानगी मागितली हाेती. अनधिकृतपणे २००० झाडे कापण्याची शक्यताही व्यक्त केली हाेती. मात्र प्रकल्पाला वाढता विराेध लक्षात घेता उद्यान विभागाने तुर्तास परवानगी राेखून धरली आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्ग प्राधिकरणाने वृक्षताेडीची परवानगी मागितली आहे. मात्र विभागातर्फे या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करून वृक्षगणना केली जाईल. त्यानंतर मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे ताे अहवाल पाठविला जाइल. ही प्रक्रिया पूर्ण करून नंतरच परवानगीबाबत विचार हाेणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, एनएचएआयतर्फे १५०० ते २००० झाडांची कटाई हाेणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी पर्यावरण अभ्यासकांच्या मते, या परिसरात असलेली ७००० झाडांची वनसंपदा आणि त्यात असलेली जैवविविधता नष्ट हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच पर्यावरणवाद्यांनी विराेध सुरू केला आहे. साेबत सामान्य नागरिक व रेल्वेच्या संघटनांनीही विराेधात आवाज उचलला आहे.

तरुणाईने केली प्रकल्पाविराेधात जनजागृती

अजनी परिसरातील ७००० हजार वृक्षांची संपदा नष्ट हाेणार असल्याने या भागातील तरुणाई प्रकल्पाच्या विराेधात उभी ठाकली आहे. लाेकमतच्या ‘अजनी वाचवा’ या वृत्त शृंखलेला समर्थन देत आवाज उठविला आहे. लाेकांनाही जागृत करण्यासाठी जनजागृती माेहीम सुरू केली आहे. बुधवारी काही तरुणांनी अजनी रेल्वे पुलासमाेर ‘अजनी वाचवा’चे बॅनर झळकावभत लाेकांना प्रकल्पाविराेधात पुढे येण्याचे आवाहन केले. कुणाल माैर्य, पंकज जुनघरे, असित मेश्राम, प्रवीण सारडा, राेशन अरसपुरे, चैतन्य ठाकरे, सुमित माेहिते, प्रतीक ढाेमणे, विशाल कावळे, तुषार जवादे आदी तरुणांनी घाेषणा देत जनजागृती केली. यापुढे साेशल फाेरमवर कॅम्पेनसह माॅर्निंग वाॅक करणाऱ्या नागरिकांनाही जागृत करणार असल्याचे कुणाल माैर्य यांनी सांगितले.

रेल्वे युनियनने दिला विराेधात प्रस्ताव

दरम्यान, सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने रेल्वे विभागाच्या फाेरममध्ये इंटर माॅडेल स्टेशनच्या विराेधात प्रस्ताव दिला दिला आहे. युनियनचे नेते देबाशिष भट्टाचार्य यांनी सांगितले, या प्रकल्पासाठी काॅलनीतील १७० क्वाॅर्टर्स ताेडण्यात येणार आहेत. यातील बहुतेक क्वाॅर्टर्स स्वातंत्र्य पूर्व काळात बांधलेले असून त्यांना पुरातत्त्व महत्त्व आहे. याशिवाय हजाराे वृक्ष ताेडण्यात येणार आहेत. नीरी साेडले तर या भागात केवळ अजनी परिसरात वनसंपदा वाचली आहे. तीही नष्ट करणे म्हणजे शहराचे फुप्फुस काढण्यासारखे आहे. त्यामुळे युनियनतर्फे ऑफिशियन फाेरमवर विराेध नाेंदविला आहे.

Web Title: Break to the tree trunk in Ajni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.