लॉकडाऊनविरुद्ध ‘मिशन रोजी रोटी’ मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:09 IST2021-04-09T04:09:00+5:302021-04-09T04:09:00+5:30

नागपूर : राज्य शासनाच्या लॉकडाऊन निर्णयाने नागपूर जिल्ह्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, या निर्णयाविरुद्ध गुरुवारी ...

‘Bread on Mission’ silent movement against lockdown | लॉकडाऊनविरुद्ध ‘मिशन रोजी रोटी’ मूक आंदोलन

लॉकडाऊनविरुद्ध ‘मिशन रोजी रोटी’ मूक आंदोलन

नागपूर : राज्य शासनाच्या लॉकडाऊन निर्णयाने नागपूर जिल्ह्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, या निर्णयाविरुद्ध गुरुवारी विविध हॉटेल्स व रेस्टॉरंट असोसिएशनने ‘मिशन रोजी रोटी’ अंतर्गत आपापल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटसमोर मूक आंदोलन केले.

आंदोलनात हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय), नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय), असोसिएशन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट (एएचएआर) आणि महाराष्ट्रातील अन्य संघटनांनी युनायटेड हॉस्पिटॅलिटी फोरम ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून एकत्रित येऊन लॉकडाऊनचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले. या आंदोलनाला नागपूर रेशिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशच्या (एनआरएचए) सर्व सदस्यांनी ‘मिशन रोजी रोटी’ आंदोलनाला समर्थन दिले. या आंदोलनात एनआरएचएसह नागपूर इटरी ओनर्स असोसिएशन व हॉटेल्स असोसिएशन नागपूरच्या सदस्यांनी आपापल्या प्रतिष्ठानाबाहेर बॅनरसह उभे राहून मूक आंदोलन केले.

एनआरएचएचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, राज्य शासनाने खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन विक्रीसाठी वेळेची मर्यादा टाकल्याने रेस्टॉरंट मालकांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पूर्वी रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी दिली होती तेव्हा सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. तसे पाहता रेस्टॉरंटचा व्यवसाय हा रात्रीच असतो. अशा भयावह स्थितीत कुणालाच ऑनलाईन व्यवसाय सुरू ठेवता येणार नाही. शासन मुंबई वगळता महाराष्ट्रातील अन्य भागाशी दुजाभाव करीत आहे. हे चुकीचे आहे. एकीकडे नागपुरात रेस्टॉरंटला ऑनलाईन खाद्यपदार्थ विक्रीसाठी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत परवानगी दिली होती, तेव्हा मुंबईत २४ तास ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरणाची परवानगी होती. त्यामुळे कर्मचारी चिंतित असून, अन्य राज्यांत नोकरी शोधत आहेत. आता संघटनांच्या सदस्यांचा धीर खचत आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पुढे काही सूट न दिल्यास भविष्यात सरकार आणि प्रशासनाला निदर्शनाच्या माध्यमातून तीव्र विरोध करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट द्यावी किंवा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी द्यावी.

Web Title: ‘Bread on Mission’ silent movement against lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.