नागपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गेल्या वर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले होते. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील ८,८०६ पालकांनी पुस्तके परत केली.
गेल्या वर्षी नागपूर जिल्ह्यात वर्ग १ ते ८ च्या १ लाख ४९ हजार ९८३ विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत ८ लाख १० हजार ४९८ पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले होते. त्यापैकी ८,८०६ पालकांनी पुस्तकांचे संच आपापल्या तालुक्यातील गट साधन केंद्राकडे पाठविले. पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता. त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला होता. पुस्तकांच्या पुनर्वापरामुळे कागदांची बचत होत असल्याने पालकांनी पुस्तके परत करावी, असे आवाहनवजा विनंती शिक्षण विभागाने केली होती.
- तालुकानिहाय पुस्तके परत केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
तालुका विद्यार्थी संख्या
हिंगणा ९००
कामठी १०००
कळमेश्वर ७५०
सावनेर ४४७
नरखेड ४८०
काटोल ७५०
पारशिवनी ६४०
मौदा ४८५
रामटेक ५८०
कुही ६५०
भिवापूर ८१०
उमरेड ४५०
नागपूर ८६४
- दृष्टिक्षेपात
- गेल्या वर्षी ८ लाख १० हजार ४९८ पुस्तकांचे संच वाटप केले.
- यावर्षी जमा झालेले पुस्तकांचे संच वजा करून मागणी करण्यात येईल.
- काय म्हणतात पालक...
शासनाने पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. पुढच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या उपयोगाला ती येऊ शकतात. आम्हीसुद्धा शालेय जीवनात एकमेकांची पुस्तके वापरत होतो. हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवावा.
राजेंद्र ठाकरे, पालक
- शासनाकडून दरवर्षी पाठ्यपुस्तकांवर कोट्यवधीचा खर्च होतो. सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांची पुस्तके पडूनच असतात. यावर्षी तर विद्यार्थ्यांची पुस्तके सुस्थितीत आहेत. सर्वांनीच पुस्तके परत करावीत.
लोकेश मसराम, पालक
- हा उपक्रम ऐच्छिक आहे. आमची पालकांवर जबरदस्ती नाही. पण शासनाचा पाठ्यपुस्तकावरील खर्च वाचत असेल तर पालकांनी पुस्तके परत करण्यास सहकार्य करावे. आतापर्यंत ज्यांनी पुस्तके परत केली नाही, त्यांनी पुस्तके परत करून सहकार्य करावे.
चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक