नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब आणि सिगारेट पॉकेटांमध्ये स्फोटके ठेवल्याचा इ-मेल मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास विमानतळावरील वरिष्ठ अधिकाऱ्याला आल्याने एकच खळबळ उडाली. केंद्रीय सुरक्षा बल आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून विमानतळ आणि लगतच्या परिसराची तपासणी केली.
तपासणी मोहीम दुपारी १२ पर्यंत सुमारे २ तास चालली. या तपासणीत काहीही आढळून आलेले नाही. अखेर मेल अफवा ठरल्याचे पुढे आले. विमानतळाची तपासणी सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली डॉग स्कॉड आणि बॉम्बशोधक पथकाने केली.
ही तपासणी मोहीम नेहमीचीच असल्याचे अधिकाऱ्यांनी विमानतळावरील प्रवाशांना सांगितले. अशा प्रकारच्या धमकीचे इ-मेल देशातील अनेक विमानतळावर आल्याची माहिती आहे.