बोगस बिलाचा ११५ कोटींचा घोटाळा उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 20:33 IST2020-02-13T20:32:21+5:302020-02-13T20:33:32+5:30
वस्तूंच्या विक्रीसाठी बोगस बिल जारी करणे आणि त्याआधारे जीएसटीचा परतावा घेण्याप्रकरणी जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला नागपुरातील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अशोक अग्रवाल याला अटक केली.

बोगस बिलाचा ११५ कोटींचा घोटाळा उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वस्तूंच्या विक्रीसाठी बोगस बिल जारी करणे आणि त्याआधारे जीएसटीचा परतावा घेण्याप्रकरणी जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला नागपुरातील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अशोक अग्रवाल याला अटक करून १३ फेब्रुवारीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले .
प्राप्त माहितीच्या आधारे डीजीजीआयच्या नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी राजा अग्रवाल यांच्याकडे नोंद असलेल्या लुधियाना व नागपूर येथील अनेक करदात्यांच्या ठिकाणांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. या धाडीत लुधियाना व नागपूर येथे नमूद करदाते अस्तित्वात नव्हते. नागपुरातील बिडगाव रोड, मंगल बाजार चौक येथील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अग्रवाल यांनी सर्व वस्तूंची विक्री कागदपत्रांवर केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. अग्रवालने वस्तूंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता केवळ बनावट पावत्या तयार केल्या होत्या.
राजा अग्रवालने ११५ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या बनावट पावत्या एकत्रितपणे स्वीकारून जारी केल्या. या बनावट पावत्यांच्या आधारे जीएसटी विभागाकडून १०.४४ कोटींच्या फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्याचे अधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आले. राजा अग्रवालने बोगस पावत्या स्वीकारणे आणि देणे तसेच त्या आधारे जीएसटी विभागाकडून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्याची कबुली दिली. त्याआधारे अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.