नागपुरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची बोगसगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST2021-03-29T04:06:02+5:302021-03-29T04:06:02+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : घटना १ : गोरेवाडा येथील ६८ वर्षीय व्यक्तीला लक्षणे आढळून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले. पहिल्या ...

नागपुरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची बोगसगिरी
सुमेध वाघमारे
नागपूर : घटना १ : गोरेवाडा येथील ६८ वर्षीय व्यक्तीला लक्षणे आढळून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले. पहिल्या दिवशी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी घरातील सदस्यांनी याची माहिती मनपाच्या कंट्रोल रूमला दिली. परंतु नंतर कोणतीही विचारणा केली. तिसऱ्या दिवशी घरातील स्वत:हून चाचणी केली. तीन सदस्य पॉझिटिव्ह आले.
घटना २ : न्यू नंदनवन गुरुदेवनगर येथील ५२ वर्षीय इसमाला कोरोनाची बाधा झाली. दुसऱ्या दिवशी मनपाकडून फोनवरून विचारणा झाली. परंतु संपर्कात येणाऱ्या संशयितांचे ‘ट्रेसिंग’च झाले नाही. त्यांची चाचणी करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही. पत्ता मिळाला नसल्याचे कारण देऊन घरी पथकही आले नाही.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाधितांच्या संपर्कातील कोरोना संशयित रुग्णांना हुडकून काढणे (ट्रेसिंग), त्यांच्या चाचण्या (टेस्टिंग) करणे, पॉझिटिव्ह आल्यास उपचाराखाली (ट्रीटमेंट) आणणे ही प्रक्रिया वेळेत होणे आवश्यक असते. एका बाधितांच्या संपर्कातील १३ ते १५ व्यक्तींचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करणे आवश्यक ठरते. सध्या ३५०० ते ४००० वर रुग्ण आढळून येत असताना एका रुग्णामागे साधारण ७ जणांचेही ट्रेसिंग होत नसल्याचे चित्र आहे. मनपाचा आरोग्य विभाग दररोज २५ हजार ट्रेसिंग होत असल्याचा दावा करीत असला तरी वरील दोन उदाहरणात केवळ कागदोपत्री पूर्तता होत असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात एखाद्या कुटुंबात रुग्ण सापडल्यावर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींशी महापालिकेकडून संपर्क साधला जात नसल्याने संसर्गाची साखळी तुटत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
-पूर्वी संपर्कात आलेल्यांचे क्वारंटाईन
उपराजधानीत कोरोनाच्या संसर्गाला मार्च २०२० पासून सुरूवात झाली. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर मोठा भर दिला होता. संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले जात होते. वस्तीच्या वस्ती ‘क्वारंटाईन’ केली जात होती किंवा ‘सील’ केली जात होती. यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होत होती.
-रोज ३० हजारांवर चाचण्या होणे गरजेचे
तज्ज्ञानुसार, सध्या रोज ३५०० ते ४००० हजार रुग्ण आढळून येत आहेत. एक रुग्ण कमीतकमी १० लोकांच्या संपर्कात येतो. यामुळे जवळपास ३० ते ३५ हजार चाचण्या होणे गरजेचे आहे. परंतु आपल्याकडे सध्या तरी १६ ते १७ हजार चाचण्या होत आहे. चाचणी करणाऱ्यांमध्ये संपर्कात आलेल्यांची संख्या कमी आणि ज्यांना छोटी-मोठी लक्षणे आहेत, त्यांचीच संख्या जास्त आहे.
-रुग्णसंख्येचा उच्चांक गाठल्यावरच खाली येऊ
तज्ज्ञानुसार, रुग्णसंख्येचा जोपर्यंत उच्चांक आपण गाठत नाही, तोपर्यंत कोरोनाचा ग्राफ खाली येणार नाही. यासाठी ‘कॉन्ट्रॅक्ट टेसिंग’ व ‘टेस्टिंग’वर भर दिला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांचे ‘टेस्टिंग’ झाल्यास पॉझिटिव्ह आलेल्यांना होम आयसोलेशन किंवा हॉस्पिटलाईज करून इतरांपासून दूर ठेवले पाहिजे.
-२८ हजार होम आयसोलेशन रुग्णांना घराबाहेर पडू न देणे महत्त्वाचे
रविवारी कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ३७,७७६ झाली. यातील २८,९३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नसल्याने किंवा सौम्य लक्षणे असल्याने ते या ना त्या निमित्ताने घराबाहेर पडतात. याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. परंतु कोणीच याला गंभीरतेने घेत नसल्यानेही रुग्ण वाढत आहेत.
:: काय करायला हवे
-जास्तीत जास्त ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ व्हायला हवी
-संपर्कात आलेल्यांना चार ते पाच दिवस गृह विलगीकरणात ठेवून नंतर ‘टेस्टिंग’ करायला हवी
-‘सुपर स्प्रेडर’ घटकाच्या चाचणीकडे विशेष लक्ष द्यायला हवे
-आताच्या तुलनेत दुप्पट ‘टेस्टिंग’ होणे अत्यंत आवश्यक आहे
-होम आयसोलेशनमधील बाधित रुग्ण घराबाहेर पडणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी
-‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’साठी आरोग्य पथकात दुपटीने वाढ व्हायला हवी
-रुग्ण वाढीसाठी त्या त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरायला हवे.