नागपूर जिल्ह्यात रेतीघाट सुपरवायझरचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:45 IST2018-05-12T22:45:12+5:302018-05-12T22:45:24+5:30
सिल्लेवाडा (ता. सावनेर) शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली. तो मृतदेह रेतीघाट सुपरवायझरचा असून, त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.

नागपूर जिल्ह्यात रेतीघाट सुपरवायझरचा निर्घृण खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिल्लेवाडा (ता. सावनेर) शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली. तो मृतदेह रेतीघाट सुपरवायझरचा असून, त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
नंदकुमार ऊर्फ छोटू रामगुलाम वर्मा (२६, रा. जुना हवामहल, सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. तो वेकोलिच्या अखत्यारित असलेल्या कन्हान नदीवरील सिल्लेवाडा रेतीघाटात सुपरवायझर म्हणून काम करायचा. शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह कन्हान नदीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून, शरीरावर कपडे नव्हते.
या घाटाचा कंत्राट नागपूर येथील खंडेलवाल यांना देण्यात आला आहे. नंदकुमार याचे घर नदीपासून जवळ आहे. तो गुरुवारी कामावर गेला होता. रात्री जेवण केल्यानंतर तो घरी परतला नव्हता. अमरजित यादव याने शुक्रवारी सकाळी नंदकुमारच्या मोटरसायकलची चावी त्याच्या घरी आणून दिली होती. त्याची एमएच-४०/जी-४८९३ क्रमांकाची मोटरसायकल जवळच असलेल्या नर्सरीत आढळून आली. दुचाकीच्या फूटरेस्टला त्याची चांदीची चेन लटकलेली होती, शिवाय तिथे रक्ताचे डाग आढळून आले. तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदविली होती.
दुचाकी आणि चावी सापडण्याचे ठिकाण यातील अंतर अर्धा कि.मी. आहे. नंदकुमारला आधी मारहाण करण्यात आली असावी, नंतर पेट्रोल टाकून जाळले असावे. त्यानंतर मृतदेह नदीत फेकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या खिशातील युको बँक व बँक आॅफ इंडियाचे एटीएम कार्ड सापडले नाही. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
गुन्हेगारांचा वावर
या परिसरात गुन्हेगारांचा वावर आहे. सिल्लेवाडा घाटातील रेती मोठ्या प्रमाणात चोरून नेली जात असून, पोेकलॅण्ड मशीनने रेतीचा उपसा केला जातो. या घाटातील रेतीचा वापर खाण भरण्यासाठी केला जातो. येथील ट्रकच्या टँकमधून डिझेल काढून ते चोरून विकल्या जाते. या भागात गांजा ओढणाऱ्यांचा व जुगार खेळणाऱ्यांचाही वावर आहे. पोलीस त्याही दिशेने तपास करीत आहेत.