रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात मृतदेहांची राख पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:06 IST2021-05-24T04:06:59+5:302021-05-24T04:06:59+5:30

नागपूर : कोरोनाने रक्ताच्या नात्यांनाही सुरुंग लावला आहे. केवळ नमस्कार करून मृत्यूनंतरचे सोपस्कार आटोपले जात आहेत. परिस्थिती अशी ...

Blood ties also froze; Ashes of corpses lying in the cemetery | रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात मृतदेहांची राख पडून

रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात मृतदेहांची राख पडून

नागपूर : कोरोनाने रक्ताच्या नात्यांनाही सुरुंग लावला आहे. केवळ नमस्कार करून मृत्यूनंतरचे सोपस्कार आटोपले जात आहेत. परिस्थिती अशी आहे की, मृतदेहाला चार खांदेही लाभत नाहीत. स्मशानांमध्ये कोरोनाच्या मृतदेहाची राख न्यायला अनेकजण तयार नाहीत. त्यामुळे सरण रचण्यापासून तर रक्षा विसर्जनापर्यंतचे काम स्मशानातील कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे.

नागपूर शहरातील मानेवाडा, गंगाबाई, मोक्षधाम, अंबाझरी, वैशालीनगर, सहकारनगर या प्रमुख घाटांवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतात. मार्च २०२१ पासून कोरोनाचे दररोज सरासरी ७० लोकांचा जीव घेतला. स्मशानात मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी जागा राहिली नाही. राख दुसऱ्याच दिवशी विसर्जन करण्यासाठी घाटावरून निर्देश दिले जात आहेत. दुसऱ्या दिवशी राख न उचलल्यास घाटावरील कर्मचारीच राखेला पोत्यात भरून ठेवत आहेत. बहुतांश अंत्यसंस्कार दोन-चार लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. कोरोनाची भीती असल्याने अनेकजण राखही घेऊन जायला तयार नाहीत. दुसऱ्या लाटेत मृत्यू वाढले असले तरी, बऱ्याच प्रमाणात परिस्थिती बदलली आहे; परंतु पहिल्या लाटेत घाटावरचे चित्र विदारकच अनुभवायला मिळाले. पहिल्या लाटेत मृत्यू झालेल्या अनेकांचे कुटुंंबीय राख घेऊन जायला तयार नव्हते. कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी घाटावर यायला तयार नव्हते. दुसऱ्या लाटेत मृत्यू झालेल्यांमध्ये काही बाहेरगावच्या मृतदेहांची राख अजूनही घाटावरच पडून आहे. स्मशानातील कर्मचाऱ्यांनी ती पोत्यात भरून ठेवली आहे.

- मानेवाडा दहन घाट

मानेवाडा दहन घाटावर कोरोनाच्या मृतदेहांवर मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार होत आहेत. हा घाट मनपाच्या हनुमाननगर झोनअंतर्गत येत असला तरी इतर झोनमधूनही मोठ्या संख्येने येथे मृतदेह येतात. सध्या या घाटावर सहा ते सात पोते राख विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहे.

- मोक्षधाम घाट

मोक्षधाम घाटावर एप्रिल महिन्यात ६० च्या सरासरीने मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. शासकीय रुग्णालयातून मृत झालेल्यांचा अंत्यसंस्कार याच घाटावर होतो. या घाटावरही काही मृतांचे नातेवाईक राख न्यायला आलेच नाहीत. ती राख घाटावरील कर्मचाऱ्यांनी पोत्यात भरून ठेवली आहे.

- सहकारनगर घाट

सहकारनगर घाटावर कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार इतर घाटांच्या तुलनेत कमी प्रमाणात होतात. येथेही एप्रिल महिन्यात सरासरी २५ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या मृतांचे नातेवाईक राख घेऊन गेले नाही, त्यांची राख सांभाळून ठेवली आहे.

- काय म्हणतात स्मशानातील कर्मचारी

ज्यांची राख घाटावर साठवून ठेवली आहे. त्यात बहुतांश बाहेरगावांतील मृतांचा समावेश आहे. आम्ही त्यांना संपर्क करून राख घेऊन जाण्यास सांगितले; पण त्यांना शक्य नसल्याने त्यांनी आम्हालाच सोपस्कार करण्यास सांगितले. मृतदेहाची राख नदीत विसर्जित व्हावी म्हणून राख घेऊन जाणाऱ्यांना विनंती करतो. तुमची राख विसर्जित करण्याबरोबरच हीपण विसर्जित करून द्या, ज्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो त्यांच्यासोबत राख विसर्जित करण्यास पाठवून देतो.

घाट कर्मचारी, मानेवाडा

आमच्या घाटावर एप्रिलपासून ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. बहुतांश लोक दुसऱ्या दिवशी राख घेऊनच जातात. एखाद्या मृताचे नातेवाईक राख घेऊन जात नाहीत. ती आम्ही संग्रहित ठेवतो. आमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ती विसर्जित करतो.

घाट कर्मचारी, मोक्षधाम

- पहिल्या लाटेमध्ये ज्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांकडून राख घेऊन जाण्यास नकार दिला गेला. आम्ही फोन करून त्यांच्याकडे राख कधी घेऊन जाणार, अशी विचारणा केल्यावर, उत्तर मिळाले की आम्ही सर्व पॉझिटिव्ह आहोत. तुम्हीच राख विसर्जित करून द्या, त्यासाठी काही पैसे लागत असेल तर सांगून द्या, असे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. दुसऱ्या लाटेत बहुतांश मृतांचे नातेवाईक राख घेऊन गेलेत. जे नातेवाईक राख घेऊन जात नाही, ती राख आम्ही विसर्जित करतो.

घाट कर्मचारी, सहकारनगर

- लॉकर फुल्ल, अस्थी झाडांवर

शहरातील काही घाटांवर महापालिकेने अस्थी ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा केली आहे. अस्थी सुरक्षित राहाव्यात म्हणून बहुतांश जण लॉकरचा वापर करीत आहेत. अस्थींचे विसर्जन करण्याच्या वेळी त्या घेऊन जातात. लॉकर फुल्ल असल्याने घाटावरील झाडांवर अस्थी लटकवून ठेवलेल्या आहेत.

Web Title: Blood ties also froze; Ashes of corpses lying in the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.