खुनानंतर ‘सायको किलर’ प्यायचा रक्त

By Admin | Updated: February 19, 2015 02:02 IST2015-02-19T02:02:09+5:302015-02-19T02:02:09+5:30

खून केल्यानंतर ‘सायको किलर ’ राकेश हाडगे हा रक्त पित होता. त्याला रक्ताची चटक लागली होती, अशी धक्कादायक माहिती आहे. माहितीगार सूत्राकडून ही माहिती प्राप्त झाली.

'Blood killer' after 'murder' blood | खुनानंतर ‘सायको किलर’ प्यायचा रक्त

खुनानंतर ‘सायको किलर’ प्यायचा रक्त

नागपूर : खून केल्यानंतर ‘सायको किलर ’ राकेश हाडगे हा रक्त पित होता. त्याला रक्ताची चटक लागली होती, अशी धक्कादायक माहिती आहे. माहितीगार सूत्राकडून ही माहिती प्राप्त झाली. मात्र तपास अधिकाऱ्याने खून करण्यामागील आरोपीचा हेतू स्पष्ट झाला नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
आरोपीने तीन दिवसात लागोपाठ तीन अनोळखी युवकांचे खून केले आहेत. सूत्राने असेही सांगितले की, केवळ नशा म्हणून तो रक्त पिण्यासारखे हे अघोरी कृत्य करीत होता. वेडसरपणाचा झटका आल्यानंतर तो चार-पाच जणांना जुमानत नव्हता. अंधार पडताच त्याची भटकंती सुरू होत होती. सामसूम ठिकाणी तो एकट्या माणसावर हल्ला करायचा. समोरच्याला काहीही कळण्यापूर्वीच चाकूने असंख्य वार करून तो मुडदा पाडायचा आणि रक्त प्यायचा.

राकेशला वडील नाहीत. त्याची आई भीक मागून त्याचे आणि आणखी एका लहान मुलाचे पालनपोषण करीत आहे.
खुनांमागील हेतू काय ?
लागोपाठ तिन्ही युवकांचा निर्घृण खून करण्यामागे आरोपीचा हेतू काय, त्यासंबंधाने सखोल तपास करणे आहे. अनोळखी मृतदेहांची ओळख करणे आहे, खुनानंतर आरोपीने मृताच्या अंगावरील कपडे काढून ठेवले आहेत, ते कोठे लपवून ठेवले, ते हुडकून काढून जप्त करणे आहे. खून करण्यासाठी आरोपीने साथीदारांची मदत घेतली असावी, त्यांचा शोध घेणे आहे. खून करण्यासाठी आरोपीने चाकूव्यतिरिक्त इतर शस्त्र आणि साधनांचा वापर केला असावा, त्या संबंधाने तपास करणे आहे. या महत्वाच्या मुद्यांवर आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला.
सरकारने नेमला वकील
पोलीस कोठडी रिमांडदरम्यान या आरोपीची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी लिगल एडमार्फत अ‍ॅड. निशा भावसागर यांची नेमणूक करण्यात आली. पोलीस कोठडी रिमांडला विरोध करताना त्या म्हणाल्या, आरोपी हा पोलीस कोठडीतच आहे आणि हा कालावधी पुरेसा आहे. या प्रकरणात चुकीने आरोपीला गोवण्यात आले, असेही त्या म्हणाल्या. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
तो काहीही बोलत नाही
या तिन्ही खुनाच्या संदर्भात हा आरोपी काहीही बोलत नाही. एक प्रश्न विचारल्यानंतर मोठ्या मुश्किलीने दहा-पंधरा मिनिटानंतर तो उत्तर देतो, असे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले.

बुरख्यात हजर केले न्यायालयात
नागपूर : ‘सायको किलर’ ला बुधवारी बुरख्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. शर्मा यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. २२ वर्षाचा राकेश हरिभाऊ हाडगे हा कळमना हद्दीतील तुळशीनगर येथील रहिवासी आहे. त्याने पहिला खून १५ फेब्रुवारी रोजी करून मृतदेह नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळशीनगर रेल्वे लाईनच्या बाजूच्या नाल्यात फेकून दिला. दुसरा खून १६ फेब्रुवारी रोजी करून मृतदेह नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतच नेहरूनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ फेकून दिला. तर तिसरा खून १७ फेब्रुवारी रोजी करून मृतदेह कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाराद्वारी तलावलगतच्या बाभळीच्या झुडपात फेकून दिला. तिन्ही मृतदेह ३० ते ३५ वयोगटातील युवकांचे असून त्यांची अद्यापही ओळख पटलेली नाही. मृतांच्या तोंडावर, मानेवर, छातीवर, पोटावर, गुप्तांगावर, मानेवर आणि पाठीवर शस्त्रांच्या असंख्य जखमा आहेत. हा आरोपी मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बाराद्वारी तलाव या घटनास्थळाच्या परिसरात सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलजवळ संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्याच्या पाठीवर काळ्या रंगाची स्कूल बॅग लटकलेली होती. पोलिसांनी ही बॅग तपासली असता त्यांना रक्ताने माखलेला चाकू आणि रक्ताने भरलेले कपडे आढळून आले होते. लागलीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाराद्वारी तलावाजवळील खुनात अटक केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एस.एम. बंडीवार यांनी आरोपीला बुरख्यात हजर करून त्याचा २४पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Blood killer' after 'murder' blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.