झाडांची कत्तल राेखण्यासाठी तरुणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST2021-02-20T04:22:00+5:302021-02-20T04:22:00+5:30
नागपूर : प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी अजनी काॅलनी परिसरात हाेणारी हजाराे झाडांची हत्या थांबविण्यासाठी रक्ताचा थेंब अन् थेंब लावण्याचा ...

झाडांची कत्तल राेखण्यासाठी तरुणांचे रक्तदान
नागपूर : प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनसाठी अजनी काॅलनी परिसरात हाेणारी हजाराे झाडांची हत्या थांबविण्यासाठी रक्ताचा थेंब अन् थेंब लावण्याचा संकल्प करीत आज तरुणांनी रक्तदान केले. झाडांनाही जीव आहे, त्यांनाही इजा हाेते, त्यांचे रक्त सांडवू नका, असे आवाहन करण्यात आले. सकाळपासून चाललेल्या अभियानात दिडशेच्यावर तरुणांनी रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘अजनी वन वाचवा’ माेहिमेंतर्गत सेव्ह अजनी ग्रुप आणि रेल्वे मेन्स शाळा माजी विद्यार्थी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये तरुणांच्या इतरही संघटनांनी सहभाग घेतला. आयएमएस प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात अजनी वन परिसरातील ७,००० च्यावर झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाविराेधात तरुणांचा मागील तीन महिन्यांपासून लढा सुरू आहे. नागरिकांना झाडे वाचविण्याचे आवाहन करीत, रस्त्यावर जनजागृती करण्यासह वनसभा, चिपकाे आंदाेलन, सायकल रॅली, हेरिटेज वाॅक असे अनेक उपक्रम या काळात राबविण्यात आले. याच अभियानाच्या शृंखलेत शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळपासून शेकडाे तरुणांनी स्वयंस्फूर्तीने शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले. दुपारपर्यंत १५० तरुणांनी रक्तदानाचा टप्पा पार केला. सेव्ह अजनी वन ग्रुपचे जयदीप दास, श्रीकांत देशपांडे, अनसूया काळे-छाबरानी, सचिन काळे, कुणाल माैर्य, राेहन अरसपूरे, पंकज जुगनारे, धीरज कडू, तुषार यांच्यासह रेल्वे मेन्स शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमधून सेव्ह रेल्वे मेन्स स्कूल अभियानाचे समन्वयक अनिकेत कुत्तरमारे, दिशू कांबळे, रणजीत यादव, पीयूष डाेइफाेडे, हर्षल पन्नासे, आशिष नेवारे, शुभम मेश्राम, अमाेल आदींचा या आयाेजनात सक्रिय सहभाग हाेता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डाॅक्टरांची टीम यामध्ये सहभागी हाेती.
मुलींना आत्मरक्षणाचे धडे
शिवजयंतीचा भाग म्हणून मिशन शक्ती अभियानांतर्गत मॅट्रिक्स वाॅरियर ग्रुपच्या तरुणांनी मुलींना आत्मरक्षणाचे धडे दिले. सकाळी हा उपक्रम राबवून साेशल मीडियावर थेट प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.
रक्तदान हे अनमाेल दान आहे आणि आज त्याची गरज आहे. अजनी वन वाचविण्यासाठी हवे ते प्रयत्न आम्ही करीत आहाेत. हजाराे झाडांची कत्तल झाल्यास हे पर्यावरणावर आघात केल्यासारखे हाेइल. सरकार व प्रशासनाने जनभावना लक्षात घेऊन, आयएमएस प्रकल्पासाठी पर्याय शाेधावेत.
- कुणाल माैर्य, समन्वयक, सेव्ह अजनीवन अभियान
काेराेना काळात रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांना त्याचा फटका बसला आहे. ही बाब लक्षात घेऊन यापूर्वीही आम्ही रक्तदान शिबिरे आयाेजित केली आहेत. अजनीवन व रेल्वे मेन्स शाळा वाचविण्याच्या अभियानाचा भाग म्हणून या अभियानातही आम्ही सहभागी झालाे आहाेत.
- अनिकेत कुत्तरमारे, समन्वयक, रेल्वे मेन्स शाळा माजी विद्यार्थी कृती समिती