कंत्राटी कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2022 01:32 PM2022-09-08T13:32:09+5:302022-09-08T13:36:10+5:30

पंचायत समितीत खळबळ : देयकावर स्वाक्षरीसाठी ५ हजारांची मागणी

Block development officer caught in ACB net while accepting bribe from contract worker | कंत्राटी कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

कंत्राटी कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

googlenewsNext

भिवापूर (नागपूर) : मानधनाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (बीडीओ) अनिता कृष्णराव तेलंग (५५) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ अटक केली.

लाचखोर गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांच्या कार्यप्रणालीने पंचायत समिती वर्तुळात असंतोषाची धग पेटत असतानाच झालेल्या या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. तक्रारकर्ती स्वाती बंडू धनविजय (२५, रा. चिखली, ता. भिवापूर) ही तरुणी पंचायत समितीच्या घरकुल विभागात कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता म्हणून मानधन तत्त्वावर कार्यरत आहे.

लाभार्थ्याच्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून प्रतिघरकूल ९५० रुपये मानधन तिला मिळते. अशा प्रकारे स्वाती धनविजय व अन्य एक कंत्राटी कर्मचारी अशा दोघांचे सहा महिन्यांचे १ लाख १ हजार ४०३ रुपये मानधन थकीत आहे. ते मिळण्यासाठी स्वाती गत काही दिवसांपासून गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांच्याकडे चकरा मारत होती. मात्र, मानधनाच्या देयकावर स्वाक्षरी करून ते मंजुरीसाठी सामान्य सेवा केंद्राकडे (सी. एस. सी.) पाठविण्याकरिता गटविकास अधिकारी तेलंग या स्वातीकडे पैशांची मागणी करत होत्या. त्यामुळे त्रासलेल्या स्वाती धनविजय यांनी सोमवारी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा रचत, पंचायत समितीचे कार्यालय गाठले. दुपारी २.३०च्या सुमारास तक्रारकर्ती स्वाती धनविजय ही गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांच्या दालनात पोहोचली. तिच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तेलंग यांना अटक केली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, प्रीती शेंडे, सारंग बालपांडे, गीता चौधरी, करुणा सहारे, अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, अमोल भक्ते यांनी केली.

पंचायत समितीच्या वर्तुळात आनंद

गटविकास अधिकारी अनिता तेलंग या मार्च २०२२मध्ये भिवापूर पंचायत समितीत रूजू झाल्या. तेव्हापासूनच त्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे पंचायत समितीचे वर्तुळ त्रस्त होते. यापूर्वी कुरखेडा येथे कार्यरत असताना तेलंग यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. त्यामुळे तेलंग याची कुरखेडा येथून हकालपट्टी करीत, त्यांना भिवापूर येथे पाठविण्यात आले. दरम्यान, तेलंग यांनी सहा महिन्यातच येथील अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना त्रासवून सोडले. अशातच झालेल्या लाच लुचपत विभागाच्या धाडसत्रामुळे पंचायत समितीच्या वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे.

पाचशेच्या नव्हे दोन हजारांच्या नोटा

गत तीन - चार महिन्यांपूर्वी एका वरिष्ठ समितीच्या भेटीगाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकडून मोठी रक्कम गोळा केली गेली. यात कुणी शंभराच्या तर कुणी पाचशेच्या नोटा जमा केल्या. मात्र, ही सर्व रक्कम २ हजाराच्या नोटांमध्येच पाहिजे, असा अट्टाहास धरला गेला. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित झाल्याने रक्कम देण्याचा कार्यक्रम रद्द झाला. मात्र, ही रक्कम अधिकारी व कर्मचाऱ्यांना परत मिळाली नाही. त्यामुळे ही रक्कम कुणी गिळंकृत केली, असा प्रश्न या कारवाईमुळे आता चर्चेत आला आहे.

Web Title: Block development officer caught in ACB net while accepting bribe from contract worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.