The blanket ambassador to mats in cold on the street human being | रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना मायेची उब देणारे 'ब्लँकेटदूत'
रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्यांना मायेची उब देणारे 'ब्लँकेटदूत'

ठळक मुद्देरात्री फिरून निराधारांचा शोध : आशिष अटलोए व टीमने जागविल्या संवेदना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...’ राष्ट्रसंतांचे हे वचन समजणे सोपे, पण ते प्रत्यक्ष अंगिकारायला संवेदनशील मनाची गरज असते. असे संवेदनशील मन घेऊन रंजल्या गांजल्यांच्या सेवेलाच धर्म मानणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. आशिष अटलोए हे होय. उन्हाळा, पावसाळ्यात वेगवेगळ्या रूपाने गरीब, निराधारांना मदत करणारे डॉ. अटलोए हिवाळ्याच्या दिवसांत ‘ब्लँकेटदूत’ म्हणून पुढे आले आहेत. रस्त्याच्या कडेला थंडीत कुडकुडणाऱ्या गरीब, निराधारांना ब्लँकेटद्वारे मायेचे उबदार पांघरूण घालत ते मानवतेचे ऋण जोपासत आहेत.
थंडीचा जोर आता वाढत चालला आहे. श्रीमंत असो वा गरीब थंडीचा तडाखा सर्वांनाच सोसावा लागतो. या अवस्थेत रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर, डिव्हायडरवर, मंदिराच्या आश्रयाने, बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर अनेक ठिकाणी गरीब, निराधार, निराश्रित माणसे थंडीमुळे कुडकुडत झोपलेली असतात. अशा माणसांच्यासाठी अनेकांच्या मनात संवेदना जागतही असेल, पण प्रत्येकाची जाणीव कृतीत उतरेलच असे नाही. पण डॉ. अटलोए यांनी संवेदनेला कृतीचे कोंदण लावले. गारठविणाऱ्या थंडीत रस्त्यावर झोपणाऱ्या निराश्रितांचे, त्यातल्या चिमुकल्यांचे काय हाल होत असतील, या एका विचाराने अस्वस्थ झालेल्या डॉ. अटलोए यांनी सहा वर्षांपूर्वी अशा निराधारांना ब्लँकेट वाटण्याचे काम सुरू केले. रात्री फिरून फिरून अशा निराश्रितांना शोधायचे, त्यांच्या अंगावर पांघरूण घालायचे आणि जेवणाची विचारपूस करून तेही पुरवायचे आणि एक आत्मिक समाधान घेऊन परतायचे. या त्यांच्या सेवाकार्यात सहकारी जुळणार नाही तर नवल. कैलास कुथे, नीलेश नागोलकर, शीलदेव दोडके, अशोक गाडेकर, चंद्रकांत चोथे, सुशील मौर्य, जयराज मार्कंड, गुंजन रठ्ठे हे सहकारी त्यांच्या सेवाकार्यात आपसुकच जुळले आणि ब्लँकेटदूत म्हणून सेवारत झाले.
समाजात गरीब-श्रीमंत अशी दरी वाढत चालली आहे. ही दरी कमी करणे सहज शक्य नाही. पण दारिद्र्याचे, अभावाचे चटके सहन करीत आयुष्य कंठणाऱ्यांना थोडी मदत केली तर त्यांच्या दु:खाची झळ थोडी तरी कमी होणार नाही. शेवटी जीवनात चांगल्या लोकांना शोधू नका, स्वत: चांगले व्हा नक्कीच कुणीतरी तुम्हाला शोधत येईल हाच मानवधर्माचा मंत्र आहे. हा मंत्र घेउन डॉ. आशिष अटलोए यांनी प्रेरणेचा झरा वाहता केला आहे.

 अशी करतात मदत  
डॉ. आशिष अटलोए आणि त्यांचे सहकारी मागील सहा वर्षापासून रस्त्यावर कोणी थंडीत कुडकुडत दिसल्यास त्याबाबत कळविण्याचे आवाहन व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करतात. दररोज त्यांना १७-१८ संदेश येतात. निरोप मिळताच ही टीम तेथे जाऊन गरजूला ब्लँकेट देते. रस्त्यावर झोपलेली व्यक्ती बहुधा उपाशीपण असते, त्यांच्यासाठी प्रसंगी ब्रेड, बिस्कीट किंवा जेवणाची व्यवस्थाही केली जाते. ज्यांना कुणाला असे गरीब, निराश्रित दिसतील त्यांनी डॉ. अटलोए यांच्या ९९२२७६५६७८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

  वेगवेगळ्या रूपाने मदत
 हिवाळ्यात ब्लँकेट दूत झालेल्या डॉ. अटलोए व त्यांच्या सहकाऱ्यांचे मदतीचे रूप वेगळेच असते. ते उन्हाळ्यात गरीब, निराधार, अनवाणी पायांसाठी चप्पल दूत होतात, तर पावसाळ्यात छत्र्या, गरीबांच्या घरांसाठी ताडपत्री देत पुढे येतात. पक्ष्यांना पाणी मिळावे म्हणून कुंड्यांचे वितरण करण्याचे काम ते करीत असतात. त्यासोबतच गरजवंतांना शासकीय योजनेतून वैद्यकीय मदत मिळवून देणे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी मदत करणे हे त्यांचे नित्याचे काम. स्वातंत्र्य संग्राम सैनिक आजोबा गौरीशंकर अटलोए यांच्याकडून मिळालेला वारसा ते अभिमानाने चालवत आहे.

Web Title: The blanket ambassador to mats in cold on the street human being

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.