रेमडेसिविरचे ब्लॅक मार्केटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:33+5:302021-04-19T04:07:33+5:30
काही मृतांचीही किट लंपास केली - पोलीस तपासात संतापजनक माहिती उघड नरेश डोंगरे नागपूर : रेमडेसिविरच्या ब्लॅक मार्केटिंगमधून जगण्या-मरण्याच्या ...

रेमडेसिविरचे ब्लॅक मार्केटिंग
काही मृतांचीही किट लंपास केली - पोलीस तपासात संतापजनक माहिती उघड
नरेश डोंगरे
नागपूर : रेमडेसिविरच्या ब्लॅक मार्केटिंगमधून जगण्या-मरण्याच्या संघर्षाचा बाजार मांडणाऱ्या नराधमांनी काही जिवंत कोरोनाबाधितांना वेळेवर इंजेक्शन न देता, त्यांना मृत्यूच्या जबड्यात ढकलल्याची अत्यंत संतापजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. रेमडेसिविरचे ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या दोन टोळ्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यातील आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबातून ही अत्यंत संतापजनक माहिती पुढे आली आहे. या टोळ्यांनी मध्य प्रदेशातही रेमडेसिविरची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचा सर्वत्र उद्रेक झाल्याने रुग्णांची संख्या १ एप्रिलपासून झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या उपचारात अत्यंत महत्त्वाचे असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अन् काळा बाजाराला वेग आला. रेमडेसिविरसाठी नागपूर, विदर्भच नव्हे तर ठिकठिकाणांहून विचारणा होत होती. रुग्णांचे नातेवाईक मागेल तेवढी रक्कम देऊन रेेमडेसिविर विकत घ्यायला तयार असल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयात देवदूत म्हणून काम करणाऱ्यांपैकी काहींनी कर्मचाऱ्यांना फितवणे सुरू केले. त्यांच्याकडून रेमडेसिविरची चोरी करवून घेतली जाऊ लागली. झटक्यात हजारो रुपये मिळत असल्याने विविध कोविड रुग्णालयातील अनेकजण या धंद्यात सहभागी झाले. ही मंडळी मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या जिवंत रुग्णाला लावण्यासाठी आणलेले इंजेक्शन त्याला लावतच नव्हते. ते लावले असे दाखवून इंजेक्शन बाहेर काढायचे अन् ते ब्लॅक मार्केटमध्ये विकायचे, अशी जीवघेणी पद्धत जरीपटका पोलिसांनी अटक केलेल्या शुअरटेक हॉस्पिटलमधील वार्डबॉय ईश्वर उर्फ बिट्टू मंडल, रोहित धोटे, रजत टेंभरे, मनोज नंदनकर आणि साथीदारांनी अवलंबली. तर कामठी पोलिसांनी अटक केलेल्या टोळीने जिवंत आणि मृत झालेल्या रुग्णांचेही इंजेक्शन चोरून बाहेर विकले होते. या टोळीत डॉ. लोकेश शाहू आशा (आशा हॉस्पिटल, कामठी), शुभम मोहदुरे आणि कुणाल कोहळे (वाॅर्डबॉय, स्वस्थम हॉस्पिटल, वर्धा रोड) आणि सुमित बागडे (दत्ता मेघे हॉस्पिटल, वानाडोंगरी) तसेच वर्धा (सावंगी) येथील दत्ता मेघे हॉस्पिटलचा कर्मचारी सातपुते याचा समावेश आहे. या दोन्ही टोळ्यांनी आतापर्यंत १०० ते १२५ इंजेक्शन विकल्याचा संशय आहे. एकट्या डॉ. लोकेश शाहूने १५ ते २० इंजेक्शन विकली. सहा रेमडेसिविर त्याने मध्य प्रदेशातील शिवनी येथे एका व्यक्तीला दिली. सातपुते याच्याकडून वर्धा येथून ९ रेमडेसिविर नागपूरला आणताना एका आरोपीच्या हातून दोन रेमडेसिविर इंजेक्शन फुटली. दरम्यान, पुढे आलेल्या या संतापजनक माहितीमुळे तपास करणारे पोलीसही स्तंभित झाले आहेत.
----
म्हणून लक्षात येत नव्हते
कोरोनाच्या रुग्णाला नेमके कधी आणि कोणते औषध अथवा इंजेक्शन दिले ते बाहेर माहीत असायचे कारण नव्हते. रुग्णाचा मृत्यू झाला किंवा रुग्ण ठीक झाला तरी औषधाचा हिशेब घेण्याची तसदी कुणी घेत नव्हते. त्यामुळे या भामट्यांचे फावत होते.
----
२५ ते ३० संशयित पोलिसांच्या रडारवर
पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि उपायुक्त निलोत्पल यांच्या थेट निगराणीत तीन दिवसांपासून या प्रकरणाचा तपास कामठी आणि जरीपटका पोलीस करत आहेत. रेमडेसिविरच्या ब्लॅक मार्केटिंगमध्ये आणखी अनेक नराधम सहभागी असल्याचे संकेत मिळाले असून, २५ ते ३० संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.
----