BJP's Sandeep Joshi as Mayor of Nagpur and Manisha Kothe as Deputy Mayor elected | नागपूरच्या महापौरपदी भाजपचे संदीप जोशी तर उपमहापौरपदी मनीषा कोठे

नागपूरच्या महापौरपदी भाजपचे संदीप जोशी तर उपमहापौरपदी मनीषा कोठे

ठळक मुद्देजोशी यांना १०४ मते : काँग्रेसच्या हर्षला साबळे यांना २६ तर बसपचे मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद यांना १० मते

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. महापौरपदी भाजपचे संदीप जोशी यांची निवड झाली आहे. जोशी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या हर्षला साबळे यांचा ७८ मतांनी पराभव केला. जोशी यांना १०४ मते मिळाली. तर साबळे यांना २६ मते मिळाली. बसपाचे महापौरपदाचे उमदेवार मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद यांना १० मते पडली. दरम्यान बैठकीला भाजपचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले होते.
भाजपतर्फे महापौरपदासाठी सत्तापक्षनेता संदीप जोशी तर उपमहापौर पदासाठी नगरसेविका मनीषा कोठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्यावतीने महापौर पदासाठी हर्षला साबळे तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे रिंगणात होते. बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापौरपदाकरिता नगरसेवक मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद तर उपमहापौरपदासाठी नगरसेविका मंगला लांजेवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे निवडणूक झाली. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निर्धारित कालावधीत महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून कुणीही माघार न घेतल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार मनीषा कोठे यांनाही १०४ मते मिळाली. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे दुनेश्वर पेठे यांना २६ मते तर बसपाच्या मंगला लांजेवार यांना १० मते मिळाली.
नागपूर महापालिकेत २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत १५२ जागांपैकी भाजपचे निर्विवाद बहुमतासह १०८ नगरसेवक निवडून आले होते. परंतु यातील प्रभाग १२ (ड) मधील भाजपचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांचे निधन झाले तर प्रभाग ५(अ) च्या नगरसेविका दुर्गा हत्तीठेले यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने दोन जागा रिक्त आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ १०६ झाले आहे. जोशी व कोठे यांना प्रत्येकी १०४ मते मिळाली. जोशी यांची महापौरपदी निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर करताच भाजप नगरसेवकांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढविल्याने भाजपचे प्रभाग ३१(ब) मधील नगरसेवक सतीश होले यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तर भाजपचे नगरसेवक बाल्या बोरकर आजारी आहेत. हे दोघेही अनुपस्थित होते. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे भाजपमध्ये इच्छुक ज्येष्ठ नगरसेवकांत रस्सीखेच सुरू होती. यावर तोडगा म्हणून महापौरपदी सत्तापक्षनेते संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना प्रत्येकी सव्वावर्ष संधी देण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला.

शिवसेनेचा बहिष्कार
राज्यात सत्तातंराची चर्चा असल्याने याचे पडसाद महापालिकेतही बघायला मिळाले. आजवर सभागृहात भाजपला पाठिंबा देणारे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया व नगरसेविका मंगला गवरे यांनी अनुपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. तसेच अपक्ष नगरसेविका आभा पांडे अनुपस्थित होत्या. त्यांना भाजपकडून उपमहापौरपदाची संधी देण्यात येणार असल्याची चर्चा होती.

काँग्रेसचे चार नगरसेवक अनुपस्थित
महापालिकेत काँग्रेसचे २९ तर राष्ट्रवादीचे एक नगरसेवक आहेत. परंतु काँगे्रस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवारांना २६ मते मिळाली. चार नगरसेवक अनुपस्थित होते. यात जिशान मुमताज मो. इरफान, बंटी शेळके, गार्गी चोपरा व रश्मी धुर्वे आदींचा समावेश आहे.

नागपूर महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप १०६
काँग्रेस २९
बसपा १०
शिवसेना २
राष्ट्रवादी १
अपक्ष १
रिक्त जागा २
एकूण १५१

Web Title: BJP's Sandeep Joshi as Mayor of Nagpur and Manisha Kothe as Deputy Mayor elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.