शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची गोळाबेरीज
By Admin | Updated: May 5, 2016 03:02 IST2016-05-05T03:02:35+5:302016-05-05T03:02:35+5:30
नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये होऊ घातली. भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा पुन्हा एकदा कायम राखण्यासाठी भाजपने गोळाबेरीज सुरू केली आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची गोळाबेरीज
गाणार यांच्या उमेदवारीवरून पेच : नवे चेहरेही इच्छुक
कमलेश वानखेडे नागपूर
नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये होऊ घातली. भाजपच्या ताब्यात असलेली ही जागा पुन्हा एकदा कायम राखण्यासाठी भाजपने गोळाबेरीज सुरू केली आहे. विद्यमान आमदार नागो गाणार हे प्रामाणिक नेते आहेत, मात्र त्यांच्या आमदारकीचा पक्ष व संघटनेला फायदा झाला नाही, असा सूर पक्षांतर्गत आळवला जात आहे. त्यामुळे गाणार यांनाच पुन्हा उमेदवारी द्यायची की नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असा पेच भाजपसमोर निर्माण झाला आहे.
गेल्या वेळी २७ नोव्हेंबर २०१० रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीसाठी भाजप सुरुवातीपासून मैदानात उतरली होती. ‘नागो गाणार, आमदार होणार’ असा नारा देत भाजपने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना रिंगणात उतरविले. सलग तीन टर्मपासून या मतदारसंघावर दबदबा असणारे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विश्वनाथ डायगव्हाणे यांना गाणार यांच्यासारख्या ‘कॉमन मॅन’ ने मात दिली. सुमारे साडेपाच हजाराहून अधिक मतांनी गाणार विजयी झाले. गाणार यांनी त्यांच्या प्रतिमेप्रमाणे कारभार केला. आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली. चौकशी लावण्यासाठी पुढाकार घेतला. भाजप नेत्यांशी संबंधित असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या चौकशीचेही त्यांनी पत्र दिले. मात्र, यामुळे पक्ष व संघटनेतील अनेक जण दुखावले गेले. याचा आधार घेत गाणार यांच्या आमदारकीचा पक्ष व संघटनेला फायदा झाला नाही, अशी चर्चा पक्षांतर्गत होऊ लागली आहे. मात्र, वरिष्ठ नेते गाणार यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीलाच पुन्हा संधी देतील, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. तर, पक्ष घेईलो तो निर्णय मान्य असेल अशी भूमिका गाणार यांनी घेतली आहे.
पक्षातील बरेच नेते व शिक्षक परिषदेतील पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहकार आघाडी अध्यक्ष संजय भेंडे, जिल्हा परिषद व ग्राम पंचायत आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रमेश मानकर, माजी महापौर डॉ. कल्पना पांडे, भाजपचे शहर महामंत्री संदीप जोशी यांच्यासह शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, योगेश बन यांचीही नावे समोर आली आहेत. उमेदवार बदलायचा असल्यास शिक्षक परिषदेच्याच नेते किंवा कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी शिक्षक परिषदेची भूमिका आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघालाही ही भूमिका मान्य आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या उमेदवार निवड समितीची बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमदार निवास येथे झाली. तीत जिल्हा अध्यक्ष, कार्यवाह, विभाग पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी सदस्य यांची मते जाणून घेण्यात आली. भाजप पदाधिकाऱ्यापेक्षा संघटनेशी संबंधित व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी, अन्यथा संघटना संपुष्टात येईल, अशी शिफारस या बैठकीत करण्यात आल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे भाजपमधील सक्रिय नेत्याला संधी दिली तरी चुकीचे होणार नाही. शेवटी पक्षाचे कार्यकर्तेच त्यांच्यासाठी प्रचाराला बाहेर पडणार आहेत, अशी काही भाजप नेत्यांची भूमिका आहे. असे असले तरी गाणार यांची उमेदवारी कापताना भाजपला खूप विचार करावा लागणार आहे. उमेदवारी बदलायचीच झाली तर दिलेल्या उमेदवारावर भ्रष्टाचार, गैरव्यवहार व लाचखोरीचा एकही आरोप नसावा, याची काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे.