भाजपची बल्ले बल्ले; शिवसेना-राष्ट्रवादीची होणार दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST2021-09-23T04:10:00+5:302021-09-23T04:10:00+5:30
सत्तापरिवर्तनासाठी काँग्रेसचा लागणार कस : काँग्रेस-राष्ट्रवादीचे इच्छुक नाराज नागपूर : महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. ...

भाजपची बल्ले बल्ले; शिवसेना-राष्ट्रवादीची होणार दमछाक
सत्तापरिवर्तनासाठी काँग्रेसचा लागणार कस : काँग्रेस-राष्ट्रवादीचे इच्छुक नाराज
नागपूर : महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. याचा फायदा पुन्हा एकदा भाजपला होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची स्थिती बऱ्यापैकी सुधारेल; पण सत्तेपर्यंत पोहोचणे कठीण जाईल, तर राष्ट्रवादी व शिवसेनेची दोन अंकी आकडा गाठण्यासाठी मोठी दमछाक होईल, असा सूर राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
नागपुरात भाजपची एकसंध बांधणी आहे. नेत्यांमध्ये वाद असले तरी ते निवडणुकीत दिसून येत नाहीत. एकदा नेत्याने आदेश दिला तर सर्व कार्यकर्ते दमाने कामाला लागतात. संघटन शक्तीच्या बळावर मोठ्या प्रभागात भाजप बाजी मारते, हे गेल्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये काहीशी नाराजी आहे. एक किंवा दोन सदस्यीय प्रभागात भाजपला ही नाराजी भोवली असती व पुन्हा सत्तेत येणे कठीण गेले असते. मात्र, तीनचा प्रभाग झाल्यामुळे भाजप नेत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ‘मास कम्पेन’च्या बळावर निवडणूक जिंकण्याचा दावा, भाजपचे पोलपंडित आतापासूनच करीत आहेत.
एकऐवजी तीनचा प्रभाग करून काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांना ही बाब रुजलेली नाही. काँग्रेसमध्ये आधीच अंतर्गत भांडणे आहेत. एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रकार जोरात होतात. अशात मोठ्या प्रभागात काँग्रेस किती टिकाव धरेल, हा प्रश्नच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे शहरात फारसे अस्तित्व नाही. दोन वर्षांपूर्वी एक सदस्यीय वॉर्ड पद्धत लागू होताच नागपुरात राष्ट्रवादी व शिवसेना कामाला लागली होती. वॉर्डात शाखा, बूथ बांधणी सुरू केली होती. एक किंवा दोन सदस्यीय प्रभागात हे दोन्ही पक्ष किमान दोन अंकी आकड्यापर्यंत पोहोचतात. गेल्यावेळी चार सदस्सीय पद्धतीत या दोन्ही पक्षांचा धुव्वा उडाला. शिवसेनेचे दोन, तर राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला. आता तीन सदस्यीय प्रभाग झाल्याने या दोन्ही पक्षांसाठी जुन्या परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. पक्षाच्या क्षमतेपेक्षा प्रभागाचा पसारा मोठा असल्याने विजय गाठताना दोन्ही पक्षांची दमछाक होईल.
..असे होतील राजकीय परिणाम
- भाजपला निवडणुकीत कॅम्पेन करणे सोपे जाईल.
- काँग्रेसला बहुमताच्या आसपास पोहोचण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागेल.
- मोठ्या प्रभागात राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद पुरणार नाही. दोन अंकी आकडा गाठणेही कठीण.
- भाजप व काँग्रेसची बंडखोरांची डोकेदुखी कमी होईल.
- पक्षांच्या भाऊगर्दीत अपक्षांना निवडून येणे आणखी कठीण होईल.
- पक्षातील नेत्यांचे महत्त्व वाढेल, कार्यकर्त्यांचा नेत्यांवरील दबाव कमी होईल.