योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपने प्रत्येक मतदारसंघात किमान ५१ टक्के मते मिळविण्याचे टार्गेट ठेवले आहे. या दृष्टीने जागोजागी कार्यकर्ता संवाद मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे विरोधकांच्या आरोपींना मोडून काढण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. त्याच दृष्टीने पक्षाच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना त्यासंदर्भातील नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.नागपूर जिल्ह्यातील महादुला व बहादुरा भागात भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच आवाहन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला किमान ५१ टक्के मते मिळतील या अनुषंगाने काम करा आणि पंचायत ते पार्लमेंट भारतीय जनता पक्षाला मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले.
भाजप हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्याच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविल्या पाहिजे. जे वचन मी विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिले होते ते मी पूर्ण करणार आहे. ज्यांना घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देणार आहे. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ते महिलांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे तुम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी घरोघरी भेट द्या, असे बावनकुळे यांनी सांगितले. जो जिंकून येऊ शकतो आणि जनतेच्या पसंतीचा असलेल्या उमेदवारालाच तिकीट देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, चेतन खडसे, हरीश कंगाली, ब्रम्हा काळे, राजेश रंगारी इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सुनिल केदारांवर हल्लाबोल
यावेळी बावनकुळे यांनी कॉंग्रेस नेते सुनिल केदार यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेस मत चोरीचा आरोप करीत आहे. परंतु ज्यांनी शेतकऱ्यांचे दीडशे कोटी रुपये खाल्ले व जे जामिनावर बाहेर आहेत, त्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे का असा सवाल त्यांनी केला. कॉंग्रेसने कामठीमध्ये मोर्चा काढला. मात्र त्या ठिकाणी मी ९५ पैकी ७५ बुथवर मागे होतो. मग मतचोरी कोणी केली, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस पक्ष खोटा अजेंडा राबवित आहे. ते खोडून काढा, त्यांना उत्तर द्या असे बावनकुळे यांनी सांगितले.