भाजप प्रवक्त्याला युएईतून धमकी, डिबेटमध्ये सहभागी न होण्याचा इशारा
By योगेश पांडे | Updated: March 26, 2025 00:20 IST2025-03-26T00:20:01+5:302025-03-26T00:20:53+5:30
अजय पाठक हे विविध प्रकरणांवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असतात.

भाजप प्रवक्त्याला युएईतून धमकी, डिबेटमध्ये सहभागी न होण्याचा इशारा
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजय पाठक यांना संयुक्त अरब अमिरातहून धमकी देण्यात आली आहे. त्यांना मंगळवारी याबाबत फोन आला. त्यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
अजय पाठक हे विविध प्रकरणांवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असतात. नागपुरात सोमवारी झालेल्या दंगलींबाबत एका डिबेटमध्ये ते सहभागी झाले होते. ते डिबेट संपल्यावर त्यांना अगोदर स्थानिक क्रमांकावरून धमकीचा फोन आला. त्यानंतर त्यांना ९७ असा ‘कंट्री कोड’वरून फोन आला. जे तू बोलत आहे व करत आहे ते ठीक नाही.
आता यापुढे तुझ्यासोबत ठीक होणार नाही, अशी समोरील व्यक्तीने धमकी दिली. पाठक यांना तीन-चार महिन्यांअगोदरदेखील धमकी आली होती. मात्र त्यांनी ती बाब गंभीरतेने घेतली नव्हती. मात्र सोमवार व त्यानंतर मंगळवारी आलेल्या धमकीच्या फोनमुळे त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित अर्ज सायबर पोलीस ठाण्यात पाठविला आहे. पाठक यांनी पोलीस सुरक्षेचीदेखील मागणी केली आहे.