भाजप, शिंदेसेना मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक एकत्र लढवणार; एकनाथ शिंदे, चव्हाण यांची नागपुरात महत्त्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:22 IST2025-12-12T12:13:53+5:302025-12-12T12:22:08+5:30
मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकीबाबत शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी रात्री शिंदे यांच्या नागपूर येथील देवगिरी बंगल्यावर झाली.

भाजप, शिंदेसेना मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक एकत्र लढवणार; एकनाथ शिंदे, चव्हाण यांची नागपुरात महत्त्वाची बैठक
नागपूर : मुंबईसह राज्यातील पालिका निवडणुकीबाबत शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी रात्री शिंदे यांच्या नागपूर येथील देवगिरी बंगल्यावर झाली. बुधवारी चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ही बैठक झाली. शिंदेसेना आणि भाजपने एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिंदेसेना व भाजपच्या अनेक नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते.
निवडणुकीदरम्यान भाजपने आपले पदाधिकारी फोडल्याचा आक्षेप शिंदेसेनेने घेतला होता. यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे यांनी नुकतीच शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. नागपूर अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुंबई पालिकेच्या जागावाटपासाठी दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी चार पदाधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा निर्णय घेतला.
मतभेदाच्या जागांवर वरिष्ठ नेत्यांनी तोडगा काढण्याचे, तर मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून घेतील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.