डीपीसीच्या बैठकीवरून भाजप-राष्ट्रवादी समोरासमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:54+5:302021-02-09T04:10:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समोरासमोर आले. ...

डीपीसीच्या बैठकीवरून भाजप-राष्ट्रवादी समोरासमोर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समोरासमोर आले.
भाजपने राज्य सरकारवर जिल्ह्याच्या निधीत कपात केल्याचा आरोप करीत निदर्शने केली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकार राज्याचा निधी देत नसल्याचा आरोप करीत निदर्शने केली. भाजपच्या आमदारांनी बैठकीवर बहिष्कार घालत निदर्शने केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या निधीत मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या कार्यकाळात ७०० कोटी रुपये मिळणाऱ्या नागपूर जिल्ह्याला आता २५० कोटी दिले जात आहे. भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनही सादर केले. यासंदर्भात पवरा यांनी आमदारांच्या मागणीवर मुंबईत विशेष बैठक आयोजित केली जाईल. कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे सांगितले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ.गिरीश व्यास, आ.समीर मेघे, आ. परिणय फुके, आ. विकास कुंभारे आणि चंदन गोस्वामी उपस्थित होते.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. केंद्र सरकारने जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले नाही, याचा निषेध केला. यावेळी नगरसेवक दुनेश्वर पेठे, महेंद्र भांगे, विजय गजभिये, हाजी आसीफ भाई, गोपी आंभोरे, बादल शेंद्रे, अमित मुडेवार आदी उपस्थित होते.