योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेना (उठाबा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप मुस्लिम-ख्रिश्चनविरोधात नाही, देशहिताचा विचार करणारे आमच्यासाठी हिंदूच आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे फडकले याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, असे बावनकुळे म्हणाले.
ते नागपुरात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.सध्या रमजान ईदचा महिना सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजान ईदसंदर्भात शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षाच्या मुस्लिम मोर्चा व मायनॉरिटी युनिटकडून ईदमिलन, इफ्तारचे आयोजन करण्यात येत आहे. भाजप मुस्लिम किंवा ख्रिश्चनविरोधी नाहीत. देशासाठी विचार करणारा प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी हिंदू आहे. देशातील प्रत्येक नागरिक आमच्यासाठी सारखाच आहे. अनेक मुस्लिम लोकप्रतिनिधी भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा पक्षात सन्मान होतच आहे. मात्र देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे व झेंडा घेऊन रॅली काढणाऱ्या लोकांना आम्ही विरोध करणारच. उद्धव ठाकरेंनी मतांसाठी राजकारण केले आहे. त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे दिसले होते. त्यांनी त्यांना का थांबविले नाही असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंनी स्वत:चा पक्ष वाचवावा
उद्धव ठाकरेंना पुढील भविष्य दिसत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेना डिवचले तर ते दूर जातील व आपल्याला जागा मिळेल असे त्यांना वाटते. मात्र असे काहीही होणार नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाला वाढविण्यासाठी काम केले पाहिजे. रोज त्यांचा पक्ष तुटतो आहे. जर त्यांनी पक्षासाठी वेळ दिला नाही तर पक्षच वाचणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी त्यांचे बूथपातळीवर पक्ष कार्यकर्ते पक्ष का सोडत आहेत त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले