भाजपाने लोकशाही प्रस्थापित करणारी यंत्रणाच ताब्यात घेतली : माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:10 IST2019-08-26T22:08:24+5:302019-08-26T22:10:07+5:30
सुरक्षा यंत्रणा, न्यायपालिका, मीडिया यावर सरकारने नियंत्रण मिळविल्याने भाजप आता सरकारच्या रुपात देशाचे मालक झाल्याचा आरोप माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केला.

भाजपाने लोकशाही प्रस्थापित करणारी यंत्रणाच ताब्यात घेतली : माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकशाही प्रस्तापित करणारी यंत्रणा भाजप सरकारने ताब्यात घेतली आहे. लोकशाहीचे प्रमुख शस्त्र असलेली मतदानाच्या प्रक्रियेवर ईव्हीएमच्या माध्यमातून ताबा मिळविला आहे. ज्या ईव्हीएमला जगाने नाकारले, सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम भरोश्याचे नाही, असे ताशेरे ओढले, त्या ईव्हीएमवर भाजपाचे नियंत्रण असल्याने देशातील जनतेला फसविण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणा, न्यायपालिका, मीडिया यावर सरकारने नियंत्रण मिळविल्याने भाजप आता सरकारच्या रुपात देशाचे मालक झाल्याचा आरोप माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी केला.
जस्टीस मुव्हमेंट तर्फे ‘पॉलिटिक्स इज दे गेम ऑफ पॉसिबल’ या विषयावर सोमवारी डॉ. आंबेडकर सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्य वक्ता म्हणून कोळसे पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर कार्यक्रमाला आंबेडकरी विचारवंत नागेश चौधरी, अॅड. मिलींद पखाले, डॉ. बी.एस. गेडाम, प्रज्वला थत्ते उपस्थित होत्या. यावेळी कोळसे पाटील म्हणाले की, बहुजन समाज हा फुले शाहू आंबेडकर यांच्या त्यागातून शिकला आहे. त्यामुळे बुद्धी, संपत्ती समाजाने मिळविली आहे. पण समाजाने मिळविलेली बुद्धी व संपत्ती समाजाच्या प्रगतीसाठी आज लावली जात नाही. समाजातील लोक म्हणतात बाबासाहेबांनी आम्हाला शिकविले. पण समाजाला आज बाबासाहेबांनी आम्हाला का शिकविले, हे सांगण्याची गरज असल्याचे कोळसे पाटील म्हणाले. देशाची व्यवस्था सडलेली असल्याचे सांगत ते म्हणाले की, या व्यवस्थेला बदलाची सुरूवात नागपुरातून झाली पाहिजे. बाबासाहेबांचे सोशनमुक्त समाजाचे तत्वज्ञान हेच समाजाला तारू शकते. राजकारणाबद्दल बोलताना म्हणाले की, चोर आहे तोच राजकारणात फीट आहे. यावेळी रामविलास पासवान यांचे उदाहरण देताना सांगितले की, सत्तेच्या लालसेपोटी पासवान म्हणतात की मोदी खरे आंबेडकरवादी आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुजित बागडे यांनी केले.
सेव्ह मेरीट सेव्ह नेशन आरक्षणविरोधी
यावेळी उपस्थित वक्त्यांनी नागपुरातून सुरू झालेल्या ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या चळवळीवर ताशेरे ओढले. ही चळवळ आरक्षण विरोधी आहे. या चळवळीच्या माध्यमातून मेरीटच्या नावावर कपट कारस्थान आखले जात आहे. आरक्षणाच्या विरोधात ही छुपी लढाई आहे.