कन्हान-पिपरीत भाजपचा ‘झेंडा’

By Admin | Updated: January 20, 2015 01:17 IST2015-01-20T01:17:45+5:302015-01-20T01:17:45+5:30

कन्हान - पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आले. त्यात एकूण १७ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ११ जागांवर विजय संपादन करीत

BJP 'flag' in Kanhan-Pipri | कन्हान-पिपरीत भाजपचा ‘झेंडा’

कन्हान-पिपरीत भाजपचा ‘झेंडा’

नागपूर : कन्हान - पिपरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आले. त्यात एकूण १७ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने ११ जागांवर विजय संपादन करीत या नगर परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळविले. शिवसेनेला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
येथील एकूण १७ जागांसाठी रविवारी (दि. १८) मतदान घेण्यात आले. चार प्रभागातील १७ जागांसाठी एकूण ९५ उमेदवारांनी नशीब आजमावले. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास रामटेक येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. दुपारी १ वाजताच्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आले. यात भारतीय जनता पक्षाने ११, शिवसेनेने तीन, काँग्रेसने दोन आणि अपक्षाने एक जागा जिंकली.
या नगर परिषदेची ही पहिली निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
प्रभाग क्रमांक - १ (अ) मधून भाजपच्या अनिता पाटील, प्रभाग क्रमांक - १ (ब) मधून काँग्रेसचे नरेश बर्वे, प्रभाग क्रमांक - १ (क) मधून सुषमा चोपकर आणि प्रभाग क्रमांक - १ (ड) मधून अपक्ष उमेदवार गेंदलाल काठोके विजयी झाले. प्रभाग क्रमांक - २ (अ) मधून भाजपचे शंकर चहांदे, प्रभाग क्रमांक - २ (ब) मधून शिवसेनेच्या वैशाली डोणेकर, प्रभाग क्रमांक - २ (क) मधून भाजपच्या लक्ष्मी लाडेकर आणि प्रभाग क्रमांक - २ (ड) मधून काँग्रेसचे राजेश यादव यांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक - ३ (अ) मधून भाजपच्या संगीता खोब्रागडे, प्रभाग क्रमांक - ३ (ब) मधून भाजपच्या राखी पराते, प्रभाग क्रमांक - ३ (क) मधून भाजपचे मनोज कुरडकर आणि प्रभाग क्रमांक - ३ (ड) मधून भाजपचे डॉ. मनोहर पाठक निवडून आले. प्रभाग क्रमांक - ४ (अ) मधून भाजपच्या नितू गजभिये, प्रभाग क्रमांक - ४ (ब) मधून भाजपचे अजय लाखंडे, प्रभाग क्रमांक - ४ (क) मधून शिवसेनेच्या करुणा आष्टनकर आणि प्रभाग क्रमांक - ४ (ड) मधून शिवसेनेचे गणेश भोंगाडे आणि, प्रभाग क्रमांक - ४ (इ) मधून भाजपच्या आशा पनिकर या विजयी झाल्या.
सदर निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सर्व विजयी उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत विजयी जल्लोष केला. भाजप कार्यकर्त्यांनी कन्हानमध्ये मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतषबाजीत विजयोत्सव केला. (प्रतिनिधी)
‘कही खुशी, कही गम’
ही नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे निवडणूक रिंगणात एकूण ९५ उमेदवार होते. यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासह अन्य प्रमुख पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार उभे होते. यात भाजप, शिवसेना व काँग्रेस हे तीन पक्ष वगळता एकाही पक्षाला त्यांचे खाते उघडता आले नाही. त्यामुळे भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेच्या गोटात मात्र शांतता पसरली होती. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाचीही मते मिळाली नाही. येथील मतदारांनी केवळ एकमेव अपक्ष उमेदवाराला पसंती दर्शविली. त्यामुळे इतर अपक्षांचा भ्रमनिरास झाला. यावेळी सहा प्रस्थापित नेत्यांना मतदारांनी कौल दिला. यात काँग्रेसचे नरेश बर्वे व राजेश यादव, भाजपचे शंकर चहांदे व डॉ. मनोहर पाठक, शिवसेनेच्या वैशाली शरद डोणेकर व करुणा आष्टनकर यांचा समावेश आहे.

Web Title: BJP 'flag' in Kanhan-Pipri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.